फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी बेल्जियममधून काही संशयितांना अटक करण्यात आली आहे. बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मायकल यांनी ही माहिती दिली.
फ्रान्स पोलिसांच्या तपासात संशयित असलेली काही वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच काही जणांनाही अटक करण्यात आली आहे, असे पंतप्रधान मायकल म्हणाले. अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी एकाची ओळख पटली असून, त्याचे नाव ओमर इस्माइल मोस्तेफाइ असे आहे.
पॅरिस हल्ल्याचे मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याशी साम्य असून या हल्ल्यात जखमी झालेल्या अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृताचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पॅरिसमधील रेस्तराँ, नाटय़गृह आणि क्रीडांगणासह सात ठिकाणी ‘आयसिस’च्या अतिरेक्यांनी शुक्रवारी रात्री भीषण आत्मघातकी हल्ले चढवत केलेल्या गोळीबार आणि बॉम्बहल्ल्यांत १२८ जण मृत्युमुखी पडले असून सुमारे ३०० नागरिक जखमी झाले आहेत. हा हल्ला म्हणजे फ्रान्सविरुद्धचे युद्धच असून कोणतीही दयामाया न दाखवता चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशी घोषणा फ्रान्सने केली आहे.