पॅरिसमधील ‘शार्ली एब्दो’ साप्ताहिकाच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याला अवघे काही दिवस झालेले असताना शुक्रवारी पॅरिसमधील गॅडुलेस्ट रेल्वेस्थानकावर बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली. या माहितीनंतर तातडीने हे रेल्वेस्थानक बंद करून तेथील सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. बॉम्बशोधक पथकाकडून तातडीने या स्थानकाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी रेल्वेस्थानक आणि आसपासच्या परिसरातील सर्व लोकांना इतरत्र हलविण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱयानेच याबद्दल माहिती दिली.
गॅडुलेस्ट हे पॅरिसमधील एक महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. हजारो प्रवाशी रोज या स्थानकावरून प्रवास करतात. पूर्व पॅरिस आणि त्या दिशेच्या अन्य देशांकडून येणाऱया रेल्वे याच स्थानकावर थांबतात. दरम्यान, पॅरिसमधील पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादविरोधी लढ्यात आतापर्यंत दहा जणांना संशयास्पद हालचालींवरून अटक करण्यात आली आहे.