किरकोळ क्षेत्रात एफडीआय आणण्याचा केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात विरोधी पक्षाने आज (सोमवार) पुन्हा एकदा प्रश्नोत्तराच्या तासात गोंधळ घातला परिणामी संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. त्याआधी अध्यक्षांवर दोन वेळा कामकाज स्‍थगित करावे लागले होते.
आज सकाळी संसदेचं कामकाज सुरू झाल्यावर लोकसभा अध्यक्षा मीराकुमार यांनी मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप लोकांना आणि जवानांना श्रध्दांजली वाहिली.
एफडीआयचा निर्णय मागे घ्‍या, अशी नारेबाजी भाजप खासदारांनी सुरू केल्यानंतर, घरगुती गॅस सिलिंडरवर सबसिडीची मागणी करीत तृणमूल कॉंग्रेसचेही खासदार त्यामध्ये सामील झाले. तर आंध्र प्रदेशचे काही खासदार तेलंगणाच्‍या मागणीसाठी घोषणा देऊ लागल्यानंतर संसदेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले.  
दरम्यान, राज्यसभेतही मुंबई हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली वाहिल्यानंतर भाजप नेते व्यैकय्या नायडू यांनी एफडीआयचा मुद्दा उपस्थित केला आणि इतर पक्षांच्या खासदारांनीही त्यात सूर मिसळायला सुरूवात केली.
नायडू म्हणाले, प्रश्नोत्तराचा तास रद्द करून एफडीआयवर चर्चा करण्यासाठी आम्ही निवेदन दिले आहे. बसपा आणि सपाच्या खासदारांनीही एफडीआयच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर अध्यक्ष हमीद अंसारी यांनी संसदेचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केलं     
दुपारी १२ वाजता दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरु झाल्‍यानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरु झाला. त्‍यामुळे दोन्‍ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्‍यात आले.