संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार अफजल गुरुला (वय ४३) शनिवारी सकाळी तिहार कारागृहात फाशी देण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अफजल गुरुचा दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर फाशीची अमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले. शनिवारी सकाळी आठ वाजता तिहार तुरुंगातील तिसऱया क्रमांकाच्या कारागृहात त्याला फाशी देण्यात आली. अफजलचा मृतदेह कारागृहातच दफन करण्यात आला आहे.
उत्तर काश्मीरमधील सोपोर भागात राहणाऱया अफजल गुरुच्या कुटुंबीयांना त्याच्या फाशीबाबत माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी त्याची दयेची याचिका फेटाळल्याचेही त्यांना कळविण्यात आले होते. 
२६ जानेवारीला फेटाळली दयेची याचिका
अफझल गुरुला फाशी देण्यात यावी, अशी शिफारस केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी २३ जानेवारीला राष्ट्रपतींकडे केली होती. त्यानंतर राष्ट्रपतींनी २६ जानेवारीला त्याचा दयेचा अर्ज फेटाळला. त्यानंतर अतिशय गोपनीय पद्धतीने त्याला ९ फेब्रुवारीला फाशी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अगदी मोजक्या पोलिस आणि कारागृह अधिकाऱयांवर फाशीची अमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
फाशीपूर्वी चेहरा निर्विकार
शनिवारी सकाळी पाच वाजता अफजल गुरुला उठविण्यात आले. नमाज पठण झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवालानंतर सकाळी आठ वाजता फाशी देण्यात आली. फाशी देण्यापूर्वी अफजलच्या चेहरा निर्विकार होता, असे कारागृहातील अधिकाऱयांनी सांगितले. 
नऊ जणांचा घेतला होता बळी
गेल्या १३ डिसेंबर २००१ मध्ये पाच दहशतवाद्यांनी संसदेच्या आवारात घुसून अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये दिल्ली पोलिस दलातील पाच जणांचा समावेश होता. केंद्रीय राखीव पोलिस दलातील एक महिला, संसदेतील दोन कर्मचारी आणि एका पत्रकाराचा समावेश होता. या घटनेनंतर पोलिसांनी काही तासांतच अफजल गुरुला अटक केली होती. 

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
Mukhtar Ansari death
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश
ram satpute marathi news, praniti shinde marathi news
सोलापूरमध्ये ‘उपऱ्या’वरूनच भाजपच्या सातपूते यांची कोंडी