बाथरुममध्ये रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला फक्त मनमोहन सिंग यांनाच माहिती असल्याचे वादग्रस्त विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केले आहे.  मोदी यांच्या विधानावर काँग्रेस राज्यसभेत गोंधळ घातला. माजी पंतप्रधानांविषयी अशा स्वरुपाचे विधान करणे योग्य नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे होते. शेवटी काँग्रेस खासदारांनी सभात्याग करत आपला निषेध नोंदवला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बुधावरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उत्तर दिले. नोटाबंदीविरोधातील लढाई ही कोणत्या पक्षाविरोधात नाही. ही राजकीय नव्हे तर भ्रष्टाचाराविरोधातील लढाई आहे. नोटाबंदीमुळे नक्षलवादी आणि दहशतवाद्यांना फटका बसला असा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. घोटाळ्यांवरुन मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधताना मोदी म्हणाले, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आहेत. गेल्या ३० ते ३५ वर्षात देशातील आर्थिक धोरणांमध्ये त्यांचे योगदान होते. सर्वात भ्रष्ट सरकारमध्ये पंतप्रधानपदी असतानाही मनमोहन सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागला नाही. बाथरुममध्ये रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला फक्त मनमोहन सिंग यांनाच माहिती असल्याचे आक्षेपार्ह विधान त्यांनी केले. मोदींच्या या विधानावर काँग्रेसचे खासदारही आक्रमक झाले होते.

विरोधकांनी सभात्याग केल्यावर मोदी या विधानावर दिलगिरी व्यक्त करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र मोदींनी आक्रमक भूमिका कायम ठेवली. पदाच्या प्रतिमेला धक्का बसत असताना तुम्ही काही बोलत नव्हता. आता तुम्ही ऐकून घेण्याचे धाडसही दाखवले पाहिजे असे मोदींनी सांगितले. नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करताना मोदी म्हणाले, काही लोक ओरडून सांगत आहेत की दहशतवाद्यांकडे दोन हजारच्या नोटा आढळल्या. पण हे पैसे त्यांनी बँकेतून लुटले होते आणि त्यानंतर हे दहशतवादी मारले गेले होते याकडेही त्यांनी लक्ष वेधले. नोटाबंदीनंतर ७०० नक्षलवाद्यांनी समर्पण केल्याचा दावा त्यांनी केला. बनावट नोटांमुळे नक्षलवाद आणि दहशतवादाला चालना मिळते. पण नोटाबंदीमुळे बनावट नोटांवरही चाप बसल्याचा दावा त्यांनी केला. भ्रष्टाचारामुळे गरीबांचे हक्क हिरावले जातात आणि मध्यम वर्गाचे शोषण होते. भ्रष्टाचार आणि काळा पैशाविरोधात ही लढाई आहे. नोटाबंदीच्या निर्णयात सरकार आणि जनता एका बाजूला आहे. बेईमान लोकांवर कारवाई केल्याने प्रामाणिक लोकांना बळ मिळेल असे मोदींनी म्हटले आहे.

केंद्र सरकार आणि माझ्यावरील आरोप मी समजू शकतो. पण रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला राजकारणात का खेचताय असा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला. स्वच्छ भारत मोहीमेची खिल्ली उडवली जाते. पण स्वच्छतेच्या बाबत आपण दक्षिण कोरिया, मलेशियासारख्या देशांचा आदर्श ठेवला पाहिजे असे मोदींनी सांगितले. माजी अधिकारी माधव गोडबोले यांच्या पुस्तकात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना १९७१ मध्ये अर्थमंत्र्यांनी नोटाबंदीची शिफारस केली होती. मात्र इंदिरा गांधी यांनी ती शिफारस फेटाळून लावली होती असा दावाही मोदींनी केला.

Live Updates
19:12 (IST) 8 Feb 2017
18:40 (IST) 8 Feb 2017
18:32 (IST) 8 Feb 2017
नोटाबंदीच्या निर्णयावर सरकार आणि जनतासोबत आहे, जनता या वाईट गोष्टींविरोधात लढण्यासाठी त्रास सहन करण्यासाठी तयार आहे - मोदी
18:27 (IST) 8 Feb 2017
आनंद शर्मा म्हणतात, तुम्ही डिजिटल व्यवहारांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करत आहात. पण भीम अॅपचा विकास करण्यावर एक रुपयाही खर्च केला नाही - मोदी
18:21 (IST) 8 Feb 2017
नोटाबंदीमुळे गैरसोय होईल, पण पुढे जावेच लागेल - मोदी
18:21 (IST) 8 Feb 2017
कॅश लेस म्हणजे जनतेला डिजिटल व्यवहारांकडे वळवणे - मोदी
18:17 (IST) 8 Feb 2017
नोटाबंदीच्या निर्णयात डाव्या पक्षांनीही आम्हाला साथ द्यावी - नरेंद्र मोदी
18:16 (IST) 8 Feb 2017
18:11 (IST) 8 Feb 2017
मोदींच्या विधानावर संताप व्यक्त करत विरोधकांचा राज्यसभेतून सभात्याग
18:09 (IST) 8 Feb 2017
मनमोहन सिंग यांच्यावरील विधानावरुन विरोधकांचा राज्यसभेत गोंधळ
18:09 (IST) 8 Feb 2017
बाथरुममध्ये रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला फक्त मनमोहन सिंग यांच्याकडेच: नरेंद्र मोदींचा राज्यसभेत टोला