संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज मध्यरात्री वस्तू-सेवाकराच्या (जीएसटी) होऊ घातलेल्या ऐतिहासिक सोहळ्यावर काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. सरकारने जीएसटीच्या अंमलबजावणी सोहळ्याला एखाद्या उत्सवाचे रूप दिले आहे. संसदेच्या स्वत:च्या अशा काही परंपरा आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केवळ तीनवेळाच संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मध्यरात्री सोहळा आयोजित करण्यात आला होता. जीएसटीच्याबाबतीत बोलायचे झाले तर ही केवळ एक करप्रणाली आहे. त्यामुळे त्याचा इतका भव्यदिव्य उत्सव करण्याची काहीही गरज नव्हती. जीएसटीची तुलना स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सोहळ्याशी करणे, हे दु:खदायक आहे. आम्ही याचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी व्यक्त केली. काँग्रेसने कालच वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) शुभारंभ सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला होता. मात्र, अगोदरच निमंत्रण स्वीकारल्याने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग या सोहळ्यात सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. तृणमूल काँग्रेस व डाव्या पक्षांनी अगोदरच बहिष्कारास्र उगारलेले आहे.

देशाच्या स्वातंत्र्याप्राप्तीच्या सोहळ्याची – नियतीशी करार – आठवण होईल, अशा रीतीचा करस्वागताचा सोहळा व्हावा, अशी सरकारची मनिषा आहे. शुक्रवारी रात्री ११ वाजता या सोहळ्याची सुरुवात होईल व तो सुमारे तासभर चालेल. मुख्य व्यासपीठावर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असेल. राष्ट्रपती व पंतप्रधान यांची भाषणे यावेळी होतील. वस्तू-सेवाकराचे औपचारिक स्वागत लॅपटॉपच्या साह्य़ाने केले जाईल, तसेच या विषयावरील दोन लघुपटांचे प्रदर्शन यावेळी केले जाईल. लोकसभा व राज्यसभेतील सर्व खासदारांना या सोहळ्याचे निमंत्रण आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे व इतर बहुतेक विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. मात्र सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह त्यांच्या मित्रपक्षांचे ज्येष्ठ नेते या कार्यक्रमास उपस्थित राहतील. काही मुख्यमंत्रीही कार्यक्रमात सहभागी होतील.