बलात्कार आणि कास्टिंग काऊच यावरून सध्या उलटसुलट चर्चा सुरु आहेत. कोरिओग्राफर सरोज खान यांनी कास्टिंग काऊचबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अशात काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनीही एक खळबळजनक आरोप केला आहे. फक्त सिनेसृष्टीतच नाही तर संसदेपर्यंत कास्टिंग काऊचचे लोण पोहचले आहे असे त्यांनी म्हटले आहे. कास्टिंग काऊच हे असे वास्तव आहे जे प्रत्येक क्षेत्रात पाहायाला मिळते. राजकारणही त्याला अपवाद नाही.

सरकारी कार्यालये असोत, लोकसभा असो की राज्यसभा कास्टिंग काऊचचे प्रकार तिथे घडतात हे कटू सत्य आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकार घडत आहेत. फक्त आता भारतीय महिलांनी पुढे येऊन याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. श्री रेड्डी या अभिनेत्रीने टॉपलेस होत दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कास्टिंग काऊचविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतही कास्टिंग काऊचचे प्रकार घडत असल्याचे अभिनेत्रींनी सांगितले. आता राजकारणातही लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरातही कास्टिंग काऊच घडत असल्याचा आरोप रेणुका चौधरी यांनी केला आहे.

चित्रपटसृष्टी कमीत कमी महिलांना बलात्कार करुन सोडून देत नाही तर कामही देते, असे व्यक्तव्य ज्येष्ठ कोरिओग्राफर सरोज खान यांनी केले. त्याआधी सरोज खान यांनी देखील सरकारी कार्यालयांमध्येही कास्टिंग काऊचचे प्रकार चालतात असे म्हटले होते. पत्रकार फक्त सिनेसृष्टीच्या मागे लागतात असाही दावा त्यांनी केला. त्यानंतर अवघ्या काही तासातच संसदेपर्यंत कास्टिंग काऊचचे लोण पोहचले आहे असे रेणुका चौधरी यांनी म्हटले आहे. रेणुका चौधरी यांच्या या वक्तव्यावरूनही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.