संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला १४ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. परंतु पावसाळी अधिवेशनापूर्वीच विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनातून प्रश्नोत्तरांचा तास वगळण्यात आला आहे. तसंच प्रायव्हेट मेंबर बिलसाठी कोणताही विशेष दिवस ठेवण्यात आलेला नाही. याव्यतिरिक्त शून्यप्रहरावर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. यावरून आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी “चार महिन्यांपूर्वीच म्हणालो होतो देशातील ताकदवान नेते महामारीचा वापर लोकशाही संपवण्यासाठी करतील,” असं म्हणत सरकारच्या या निर्णयावर टीका केली.

१४ सप्टेंबरपासून सुरु होणारं पावसाळी अधिवेशन कोणत्याही सुट्टीशिवाय १ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार पावसाळी अधिवेशनातून प्रश्नोत्तरांचा तास रद्द करण्यात आला आहे. यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. महामारीच्या मागे लपून लोकशाहीची हत्या केली जात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी केला आहे.

संसदेच्या अधिवेशनाच्या १५ दिवस अगोदर प्रश्नोत्तराच्या तासासाठी खासदारांना प्रश्न देणं आवश्यक आहे. पावसाळी अधिवेशनाची सुरूवात १४ सप्टेंबरपासून होत सआहे. तर काय प्रश्नोत्तराचा तास रद्द केला? जेव्हा संसदेच्या कामकाजाचे तास समान आहेत तर प्रश्नोत्तराचा तास का रद्द केला? लोकशाहीच्या हत्येसाठी महामारीला निमित्त केलं जात असल्याचं ही डेरेक ओ ब्रायन म्हणाले.

काय म्हणाले थरूर ?

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनीदेखील यावरून सरकारवर टीका केली आहे. “देशातील ताकदवान नेते माहामारीचा वापर लोकशाही संपवण्यास करू शकतात हे मी चार महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं. संसदेच्या नोटीफिकेशननुसार यावेळी प्रश्नोत्तरांचा तास होणार नाही हेच दिसत आहे. आमच्या सुरक्षित ठेवण्याच्या नावावर हे किती योग्य आहे,” असं शशी थरूर म्हणाले. लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारणं हे ऑक्सिजनप्रमाणे आहे. परंतु सरकार संसदेला नोटीस बोर्डप्रमाणे बनवू इच्छित आहे. तसंच त्यांना आपलं बहुमत रबर स्टॅम्पप्रमाणे बनवायचं असल्याचंही ते म्हणाले.