राज्यसभेने सुचविलेल्या पाच सुधारणा फेटाळल्या
राज्यसभेने सुचविलेल्या पाच सुधारणा आणि घाईगडबडीत निर्णय न घेण्याची विरोधकांची विनंती फेटाळून बुधवारी लोकसभेत आधार विधेयक मंजूर करण्यात आले. वरिष्ठ सभागृहाने सुचविलेल्या पाच सुधारणा फेटाळून लोकसभेत आधार विधेयक २०१६ आवाजी मतदानाने मंजूर केले. त्यानंतर लोकसभेचे कामकाज २५ एप्रिलपर्यंत तहकूब केल्याची घोषणा करण्यात आली.
राज्यसभेने सुचविलेल्या सुधारणांसह अथवा सुधारणांविना लोकसभेत धन विधेयक मंजूर झाले की ते विधेयक दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्याचे मानले जाते. राज्यसभेने सुधारणा सुचवून ते विधेयक तातडीने लोकसभेकडे पाठविण्यात आल्यानंतर तातडीने ते लोकसभेत मांडण्यात आले.
लाभार्थीना योजनांचा थेट लाभ व्हावा यासाठी आधार विधेयक हे महत्त्वाचे साधन असल्याचे सरकारचे मत आहे. परंतु आधारची सक्ती करता येणार नाही, तर ते ऐच्छिक असल्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असून सरकारची कृती हे न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन आहे, अशी टीका विरोधकांनी केली.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दोन्ही सभागृहात हे विधेयक मांडले. आधारचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने संसदेत त्याबाबतचा कायदा करता येणार नाही, हा विरोधकांचा आक्षेपही जेटली यांनी फेटाळला.