विद्यमान सरकारच्या कार्यकाळातील अखेरचे अधिवेशन सुरळितपणे पार पडण्याची चिन्हे नाहीत. अगास्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणातील आरोपीने केलेला खुलासा काँग्रेसला भोवणार आहे. हा सौदा निश्चित करायचा असेल तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व त्यांच्या निटकवर्तीयांना राजी करावे, असे आरोपी मायकेल यांने इटलीच्या न्यायालयात सांगितल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने भाजप आक्रमक झाला आहे. यावरून बुधवारपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढविण्याची रणनिती रालोआच्या बैठकीत आखण्यात आली. बुधवारपासून अधिवेशन सुरु होत आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली म्हणाले की, वाढत्या महागाईवर सरकारला उत्तर द्यावेच लागेल. याशिवाय अगास्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्यात काय झाले, याचीही माहिती द्यावी लागेल. सभागृहाचे कामकाज चालण्यासाठी भाजपचे नेहमीच सहकार्य असते. परंतु काँग्रेसलाच ते नको असते, असा आरोप जेटली यांनी केला.  
याशिवाय तेलंगणाचा मुद्दाही यंदा गाजणार आहे. विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज होत नाही या सत्ताधाऱ्यांच्या आरोपाला लोकसभा विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले. सत्ताधारी पक्षातच तेलंगणावरून दोन गट पडलेले असल्याने कामकाज होत नसल्याचा आरोप आमच्यावर करू नये, असे स्वराज यानी खडसावले. या सरकारच्या कार्यकाळात गेल्या पाच वर्षांत १६५ विधेयके मंजूर करण्यात आली आहेत.