गोंधळामुळे २५० तासांचे कामकाज वाया

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज अखेर शुक्रवारी संस्थगित करण्यात आले. एकूण २५० तासांचे कामकाज विरोधकांच्या गोंधळामुळे वाया गेले. राज्यसभेत १९ पैकी पाच तारांकित प्रश्नांना मंत्र्यांनी राज्यसभेत उत्तरे दिली, तर लोकसभेच्या २९ बैठकांत ५८० पैकी केवळ १७ प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. विरोधकांनी तीन अविश्वास ठराव मांडले होते ते चर्चेला आले नाहीत.

आंध्र प्रदेशला विशेष दर्जा, कावेरी पाणी व्यवस्थापन मंडळ, पुतळ्यांची मोडतोड, अ‍ॅट्रॉसिटीवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, उत्तर प्रदेशातील कासगंजमधील परिस्थिती अशा अनेक मुद्दय़ांवर वाद उकरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ करण्यात आला. अधिवेशनाचा दुसरा टप्पा ५ मार्चला सुरू झाला तेव्हापासून २२ वेळा बैठका झाल्या, पण कामकाज झाले नाही. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभेच्या कामकाजाच्या आढावा अहवालात म्हटले आहे, की सभागृहाचे कामकाज ३४ तास ५ मिनिटे झाले व २९ बैठका झाल्या. १२७ तास ४५ मिनिटे गोंधळात गेली. ९ तास ४७ मिनिटे तातडीचे कामकाज करण्यात गेली. ५८० तारांकित प्रश्न होते त्यातील १७ प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. दिवसात ०.५८ प्रश्न या वेगाने उत्तरे दिली गेली. उर्वरित तारांकित प्रश्न व ६६७० अतारांकित प्रश्नांची उत्तरे सभागृहाच्या पटलावर मांडण्यात आली. अर्थ विधेयके २०१८ सह पाच विधेयके  यात मंजूर झाली. पाच नवीन विधेयके मांडण्यात आली. उपदान अदा सुधारणा विधेयक २०१७, विशेष मदत (सुधारणा) विधेयक २०१७ ही विधेयके संमत झाली. लोकसभा हा लोकांच्या हिताचे प्रश्न मांडण्याचा पवित्र मंच आहे. त्यामुळे सदस्यांनी व्यापक देशहित लक्षात घ्यायला हवे होते, अशी खंत महाजन यांनी व्यक्त केली.

शेवटच्या दिवशीही अद्रमुक व काँग्रेस सदस्यांनी कावेरी पाणी व्यवस्थापन मंडळाच्या प्रश्नावर गोंधळ घातला. तेलुगु देसमच्या सदस्यांनी आंध्रला विशेष दर्जाच्या मुद्दय़ावर गोंधळ केला. तुम्ही शेवटच्या दिवशीही गोंधळ करीत आहात, असे महाजन यांनी सांगितले. अविश्वास ठराव नोटिसा  विचारात घ्यायच्या आहेत असे सांगून तुम्हाला कामकाज नको असेल, तर मी कामकाजाचा आढावा वाचून दाखवते असे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी सभागृहात उपस्थित होते. कामकाज सुरू होण्याच्या आधीच विरोधकांनी हौद्यात जमून गोंधळ सुरू केला.