संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला १५ डिसेंबरपासून सुरुवात होणार असल्याची माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली आहे. १५ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत संसदेचे अधिवेशन होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गुजरात विधानसभा निवडणुकीमुळे मोदी सरकार हिवाळी अधिवेशनाला उशीर करत असल्याचा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षांनी केला होता. मंत्र्यांचे घोटाळे, राफेल खरेदी व्यवहार, जीएसटी आणि नोटाबंदीवरुन सरकार अडचणीत येणार असल्यानेच मोदी सरकार हिवाळी अधिवेशन सुरु करत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

‘तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी सत्य लपत नाही. मोदीजी, लपवालपवी थांबवा आणि संसदेचे कामकाज सुरु करा. त्यामुळे राफेल खरेदी व्यवहारातील सत्य देशाच्या जनतेसमोर येईल,’ असे ट्विट करत राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. सरकार हिवाळी अधिवेशन सुरु करण्यात टाळाटाळ का करत आहे, असा प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांनीदेखील उपस्थित केला होता. ‘विरोधकांना सामोरे जाण्याचे धाडस केंद्र सरकारकडे नाही. त्यामुळेच विविध कारणे देऊन पंतप्रधान मोदींकडून संसदेचे अधिवेशन सुरु करण्यात चालढकल केली जात आहे,’ अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी थेट मोदींना लक्ष्य केले होते.

सोनिया गांधींच्या टीकेला अर्थमंत्री अरुण जेटलींनी प्रत्युत्तर दिले होते. ‘निवडणुकीच्या काळात अनेकदा संसदेच्या अधिवेशनाचे वेळापत्रक बदलण्यात आले आहेत. काँग्रेस सत्तेत असतानाही त्यांनी अनेकदा अशाप्रकारे अधिवेशनाच्या वेळापत्रकात बदल केले होते,’ असे जेटलींनी म्हटले. ‘निवडणूक प्रचार सुरु असल्याने २०११ मध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाने अधिवेशनाच्या कालावधीत बदल केला होता. निवडणुकीच्या काळात अधिवेशनाच्या वेळापत्रकात बदल होतो. याआधीही अनेकदा असे घडले आहे,’ असेही ते म्हणाले.

राजकोटमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना जेटलींनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन काँग्रेसला लक्ष्य केले. ‘काँग्रेसने देशाला सर्वात भ्रष्ट सरकार दिले. त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार बोकाळला होता. मात्र मोदींनी देशाला अतिशय प्रामाणिक सरकार दिले आहे,’ अशा शब्दांमध्ये जेटलींनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली.