संसदेच्या माहिती-तंत्रज्ञान समितीने ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॅक डॉर्सी यांना समन्स जारी केला आहे. सोशल मीडियावरील नागरिकांच्या हक्कांच्या रक्षणासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राबाबतच्या संसदीय समितीने डॉर्सी यांना समन्स जारी केला असून २५ फेब्रुवारी रोजी समितीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. संसदीय समितीचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार अनुराग ठाकुर यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली.

भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने एक फेब्रुवारीला अधिकृत पत्राद्वारे टि्वटरचे सीईओ आणि अधिकाऱ्यांना हजर होण्यासाठी समन्स बजावले होते. सात फेब्रुवारीला संसदीय समितीची ही बैठक नियोजित होती. पण टि्वटरचे सीईओ जॅक डॉर्सी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणखी वेळ देण्यासाठी ११ फेब्रुवारी रोजी ही बैठक घेण्याचं ठरलं. त्यानुसार ट्विटर इंडियाचं एक पथक संसदेत पोहोचलं, मात्र जोपर्यंत जॅक डॉर्सी अथवा वरिष्ठ अधिकारी येत नाही तोपर्यंत भेटणार नाही असं समितीने स्पष्ट केलं, आणि ट्विटरच्या सीईओंना हजर राहण्यासाठी अजून १५ दिवसांची वेळ दिली.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या रक्षणाचा मुद्दा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळीचा ठरला आहे. यामुळे नागरिकांबद्दलच्या माहितीची सुरक्षा आणि समाज माध्यमांद्वारे निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करण्याच्या पाश्र्वभूमीवर हे समन्स बजावण्यात आले आहे.