सभागृहाच्या कामकाजात अडथळे आणून संसदीय स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये, असे आवाहन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केले. माझा कोणावरही वैयक्तिक आरोप करण्याचा हेतू नाही. मात्र, संसदेत गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज बंद पाडणे, ही सवय बनता कामा नये, असे राष्ट्रपतींनी सांगितले.हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून नोटाबंदीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज रोखून धरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत नोटाबंदीच्या निर्णयाबद्दल स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. सत्ताधारी भाजपकडूनही हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविण्यात आला असून विरोधकांसमोर न झुकण्याची भूमिका घेण्यात आली आहे. या गोंधळासाठी सत्ताधारी आणि विरोधक परस्परांना जबाबदार धरत आहे. हा तिढा सुटत नसल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून दोन्ही सभागृहांमध्ये फारसे कामकाज होऊ शकलेले नाही.

या सततच्या गोंधळावर बुधवारी भर लोकसभेत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी स्वपक्षीयांना खडे बोल सुनावले होते. सततच्या गोंधळावर संतापलेल्या अडवाणींनी त्यासाठी थेट लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनाच जबाबदार धरले. सभागृह चालवायचे नसेल तर मग अधिवेशन संस्थगित करा, असे तिरकसपणेही ते बोलले. रुद्रावतार धारण केलेल्या अडवाणींची समजूत घालताना अनंतकुमार आणि संसदीय कामकाज खात्याचे राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांची  त्रेधातिरपिट उडाली होती. तत्पूर्वी सकाळी भाजप खासदारांच्या बैठकीमध्ये मोदींनी संसदेतील गोंधळासाठी विरोधकांच्या लोकशाहीविरोधी वर्तनाला जबाबदार धरले. नोटाबंदीसारख्या महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयावर विरोधक चर्चा करीत नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला, पण त्यानंतर काही तासांतच अडवाणींनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला.
पक्षाच्या निर्णयप्रक्रियेतून खडय़ासारखे वगळलेल्या अडवाणी यांनी सोळाव्या लोकसभेत तोंडाला चिकटपट्टी लावणे पसंद केले आहे, पण बुधवारी त्यांच्या संयमाचा कडेलोट झाला. नेहमीच्या मुद्दय़ांवर गोंधळ घालत विरोधक सभापतींपुढील मोकळ्या जागेत येऊन घोषणा देऊ  लागल्यानंतर अडवाणींनी सभागृह चालविण्याच्या पद्धतीवर अनंतकुमारांच्या कानावर आपली नाराजी घातली. पण गोंधळ वाढत गेल्यानंतर अडवाणी कुमारांकडे पाहून म्हणाले, ‘‘सभागृह कोण चालवीत आहे? सभापती आणि संसदीय कामकाजमंत्री सभागृह चालविताना दिसत नाही. (या गोंधळाला) तुम्हीही त्यांच्याप्रमाणेच (विरोधक) जबाबदार आहेत.’’त्यांचा आवाज पत्रकारांच्या गॅलरीपर्यंत ऐकू येत होता. तेव्हा, ‘‘हळू बोला.. पत्रकारांना ऐकू जात आहे. सगळे जण पाहात आहेत..’’ असे अनंतकुमार व अहलुवालिया म्हणताच ते आणखीनच लालबुंद झाले. पत्रकार गॅलरीकडे पाहून हातवारे करीत ते म्हणाले, ‘‘तुम्ही सभागृह चालवीत नसल्याचे मी सभापतींना स्पष्टपणे सांगेन. तसे जाहीरपणे सांगेन.’’

तेवढय़ातच सभापतींनी कामकाज तहकूब केल्याने त्यांच्या संतापाला पारावर उरला नाही. जवळच्या अधिकाऱ्याला त्यांनी विचारले, ‘‘कामकाज कधीपर्यंत तहकूब केले?’’ तो म्हणाला, ‘‘दोन वाजेपर्यंत.’’ त्यावर अडवाणी तिरकसपणे म्हणाले, ‘‘..तर मग अधिवेशनच संस्थगित का करीत नाही?’’ अडवाणींची समजूत घालण्यासाठी आणखी काही मंत्री धावले. कसेबसे त्यांना शांत  करण्यात आले. त्यानंतर ते कोणाशीही काहीही न बोलता सभागृहाबाहेर पडले. त्यांना ‘पृथ्वीराज रोड’वरील निवासस्थानापर्यंत सोडण्यासाठी स्वत: अहलुवालिया गेले.