विरोधी पक्षांनी सरकारविरोधात लोकसभेत सादर केलेला अविश्वास प्रस्ताव लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वीकारला आहे. अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत शुक्रवारी चर्चा होईल. संसदेचे पावसाळी अधिवेशन आजच (बुधवार) सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी सभागृहात गदारोळ पाहावयास मिळाला.

केंद्रातील मोदीसरकार विरोधातील हा पहिलाच अविश्वास प्रस्ताव आहे. संख्याबळामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारला कोणताच धोका नाही. रालोआचे लोकसभेत ३१० खासदार आहेत. अशावेळी अविश्वास प्रस्ताव हा फक्त सरकारविरोधात सांकेतिक विरोध दर्शवण्याचे माध्यम ठरेल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. जाणून घेऊयात सरकारची सध्याची परिस्थिती काय आहे.

भाजपा- २७३, शिवसेना- १८, लोजपा-०६, शिरोमणी अकाली दल-०४, इतर-०९ असे ३१० खासदार रालोआकडे आहेत.

बुधवारी समाजवादी पक्ष आणि तेलुगू देशम पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत मॉब लिचिंगच्या वाढत्या घटना आणि आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसह अनेक मुद्यांवरून विरोध केला. यादरम्यान काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, जे सरकार शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडत आहे. ज्या सरकारच्या काळात महिलांवरील बलात्काराच्या घटनेत वाढ होत आहे, त्या सरकारविरोधात आम्ही अविश्वास प्रस्ताव ठेवतोय.

वर्ष २०१४ मधील रालोआची आकडेवारी अशी होती..

भाजपा-२८२, शिवसेना-१८, टीडीपी-१६, लोजपा-०६, शिरोमणी अकाली दल-०४, अन्य-११ असे ३३७ खासदार होते.

टीडीपीचे खासदार के के श्रीनिवास यांनी रालोआ सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला. सुमित्रा महाजन यांनी या प्रस्तावाला मंजुरी देताना यावर २ ते ३ आठवड्यात चर्चेची तारीख निश्चित केली जाईल असे सांगितले. श्रीनिवास यांचे नाव लॉटरी पद्धतीने काढण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कारण अनेकांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळत नसल्याचे कारण पुढे करत टीडीपीने याचवर्षी मार्च महिन्यात रालोआला सोडचिठ्ठी दिली होती. श्रीनिवास यांनी शून्य प्रहारात हा प्रस्ताव सादर केला आणि लोकसभा अध्यक्षांनी तो स्वीकारला. टीडीपीच्या खासदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातही अविश्वास प्रस्ताव सादर करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, लोकसभा अध्यक्षांनी तो फेटाळला होता.

विरोधी पक्षाकडे: काँग्रेस ४८, अण्णा द्रमुक ३७, तृणमूल काँग्रेस ३४, बीजेडी २०, इतर १२८