फेसबुकचे अधिकारी जोएल काप्लान समितीसमोर हजर

नवी दिल्ली : निवडणुकीतील गैरवापर टाळण्याच्या फेसबुक या समाजमाध्यम कंपनीच्या क्षमतेवर संसदीय समितीने चिंता व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर समाजमाध्यमांचा गैरवापर होण्याच्या शक्यतेमुळे ट्विटर कंपनीच्या अधिकाऱ्यांची सुनावणी केल्यानंतर बुधवारी फेसबुकचे अधिकारी माहिती तंत्रज्ञान खात्याच्या संसदीय स्थायी समितीसमोर हजर झाले.  देशातील खासदारांनी निवडणुकीत समाजमाध्यमांचा गैरवापर व त्यावर प्रभाव टाकण्याची शक्यता याबाबत व्यक्त केलेल्या शंकांना फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिली. वापरकर्त्यांच्या वेब पेजवर निवडणुकीच्या वेळी जाहिरात कुणी दिली त्याची ओळख व ठिकाण यांचा उल्लेख केला जाईल. त्या जाहिरातीचे पैसे कुणी दिले याची माहितीही दिली जाणार आहे.

सूत्रांनी सांगितले, की फेसबुक ही संमिश्र कंपनी असून आशय, जाहिराती व विपणन व्यवस्था यांचे नियमन करण्यासाठी कुठली प्रणाली वापरण्यात येणार आहे याचे उत्तर त्यांना देता आले नाही. आशय व्यवस्थापनात आम्ही सुयोग्य अशी व्यवस्था करू शकलो नाही, असेही फेसबुकने स्पष्ट केले आहे.

फेसबुकने यापूर्वीच्या चुकांसाठी माफी मागितली असली, तरी अजूनही ते छाननी व पारदर्शकता यात काही करण्याची इच्छाशक्ती दाखवायला तयार नाहीत, असे समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे. अलिकडचा पुलवामा हल्ला व दहशतवाद याबाबत फेसबुक कर्मचाऱ्यांनी जी विधाने केली होती, त्यावर फेसबुकचे जागतिक सार्वजनिक धोरण उपाध्यक्ष जोएल काप्लान यांनी माफी मागितली आहे.