माहिती तंत्रज्ञान प्रकरणांच्या एका संसदीय समितीने फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांना ‘बजरंग दल’वर प्रतिबंध न लावल्याप्रकरणी सवाल केला असून कारणे दाखवा नोटीसही पाठवली आहे. पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिलं आहे.

काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या अध्यक्षतेखालील माहिती आणि तंत्रज्ञानसंबंधी संसदीय समितीसमोर फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन बुधवारी हजर झाले. यावेळी समितीने त्यांना नागरिकांच्या माहितीच्या सुरक्षेबाबत विचारणा केली. यावेळी मोहन यांच्यासोबत फेसबुकचे लोकनिती संचालक शिवनाथ ठुकराल हे देखील उपस्थित होते.

सुत्रांनी सांगितलं की, थरुर यांच्यासोबत काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी मोहन यांना बजरंग दलवर प्रतिबंध लावण्यासंबंधी वॉल स्ट्रीट जर्नलचा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालाच्या अनुषंगाने सवाल केला. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात म्हटलं की, “अंतर्गत मुल्यांकनाशिवाय फेसबुकने आर्थिक कारणं आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची चिंता असल्याने बजरंग दलवर बंदी घातली नाही.”

भाजपाशी जवळचा संबंध असल्याने बजरंग दलवर बंदी नाही

माध्यमातील एका वृत्तानुसार, सत्ताधारी भाजपाशी जवळचा संबंध असल्याने फेसबुक उजव्या विचारसरणीच्या समुहांविरोधात कारवाई करताना घाबरते. म्हणूनच बजरंग दलवर कारवाई केल्यास भारतात फेसबुकच्या व्यावसायिकेला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना धोका निर्माण होऊ नये म्हणून फेसबुकने या संघटनेबाबत नरम धोरण अवलंबल आहे. दरम्यान, फेसबुकच्या सुरक्षा टीमने या संघटनेला संभाव्य धोकादायक संघटना म्हणून टॅग केल्याचं म्हटलं आहे.