माहिती तंत्रज्ञानासंबंधीच्या संसदीय स्थायी समितीसमोर येत्या दोन सप्टेंबरला हजर होण्यासाठी फेसबुकला समन्स पाठवले आहे. फेसबुकने सत्ताधारी भाजपाच्या काही नेत्यांना हेट स्पीचचा नियम लागू केला नाही असा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या गैरवापरासंबंधी चर्चा होणार आहे. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

इंटरनेट शटडाऊनच्या विषयावरही समितीमध्ये चर्चा होणार आहे. नागरिकांच्या अधिकारांची सुरक्षितता, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर रोखणे, डिजिटल विश्वात महिला सुरक्षेवर या बैठकीत विशेष भर देण्यात येईल. दरम्यान या प्रकरणावरुन जोरदार राजकारणही सुरु आहे.

समितीचे वरिष्ठ सदस्य आणि भाजपा नेते निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून शशी थरुर यांना समितीच्या चेअरमन पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. राजकीय अजेंडयासाठी थरुर या समितीचा वापर करत आहेत असा आरोप केला आहे.

काय आहे प्रकरण
सोशल मीडियामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुकने सत्ताधारी भाजपाला झुकते माप दिल्याचा आरोप होत आहे. व्यावसायिक कारणांमुळे चार व्यक्ती आणि भाजपाशी संबंधित असलेल्या गटांना हेट स्पीचचा नियम लागू होत नाही, असे फेसबुकच्या भारतातील धोरण संचालकांचे म्हणणे आहे असे वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या वृत्तात म्हटले होते. फेसबुकने भाजप नेत्यांच्या द्वेषमूलक पोस्टवर कारवाई केल्यास भारतात कंपनीला व्यावसायिक धक्का बसू शकतो, असे कंपनीच्या धोरण संचालक आँखी दास यांनी आक्षेपार्ह मजकूर व चित्रफिती लक्षात आणून देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगितले होते.