संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षांच्या खासदारांना ‘जीएसटी’चा मूलमंत्र दिला. जीएसटी म्हणजे ‘ग्रोविंग स्ट्राँगर टुगेदर’ (एकत्रितपणे सामर्थ्यशाली) असे सांगत मोदींनी विरोधी पक्षांना सहकार्याचे आवाहन केले. राष्ट्रहितासाठी सर्वांनी प्रयत्न केल्यास काय परिणाम होतो हे जीएसटीच्या अंमलबजावणीतून दिसून येते असे मोदींनी म्हटले आहे.

स्वयंघोषित गोरक्षकांचा हिंसाचार, शेतकरी आंदोलन, काश्मीरमधील तणाव, अमरनाथ यात्रेवरील हल्ला, चीनची घुसखोरी आदी मुद्द्यांवरुन विरोधक पावसाळी अधिवेशनात संसदेत सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पावसाळ्यात शेतकरी मेहनत करुन देशाची भूक भागवतात. या शेतकऱ्यांना मी नमन करतो असे मोदींनी सांगितले. पावसाळी अधिवेशनात संसदेतील प्रत्येक खासदार राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. सर्व पक्षीय खासदारांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर देशात नवीन उत्साह संचारला आहे. पावसामुळे जसा मातीत सुगंध येतो. तसंच जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर पावसाळी अधिवेशनात नवीन उत्साह दिसून येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रहितासाठी सर्व पक्ष एकत्र येऊन काम करतात त्यावेळी काय परिणाम होतो हे जीएसटीतून दिसून येते असे त्यांनी सांगितले.

लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरु होताच माजी खासदारांना आणि अमरनाथ यात्रेत मृत्यू झालेल्या भाविकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.