देशाच्या राज्यघटनेमध्ये सुधारणा करण्यात आल्यानंतर घेण्यात येणाऱ्या इजिप्तच्या पहिल्याच संसदीय निवडणुकांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत. २७ एप्रिलपासून सुरू होणारे केंद्रीय निवडणुकांचे वेळापत्रक ईस्टर रविवार येत असल्याने काहीसे अडचणीचे ठरत होते. त्यातच इजिप्तमधील विरोधी मतप्रवाहाचे नेते मोहम्मद अल बारदेई यांनी निवडणुकांवर बहिष्कार घालावा, असे आवाहन इजिप्तच्या जनतेला केले असल्यामुळे मतदानाच्या आकडेवारीवर परिणाम होण्याची शक्यता होती.यावर उपाय म्हणून इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांनी केंद्रीय निवडणुका पाच दिवस आधी घेण्यात येणार असल्याचे एका परिपत्रकाद्वारे जाहीर केले. नवीन वेळापत्रकानुसार या निवडणुका आता २२ एप्रिलपासून सुरू होतील. या निवडणुकांचा पहिला टप्पा २२ आणि २३ एप्रिल रोजी, दुसरा टप्पा ११ व १२ मे रोजी आणि तिसरा टप्पा २८, २९ मे रोजी होईल. शेवटचा टप्पा १५ व १६ जून रोजी पार पडेल, असे जाहीर करण्यात आले आहे.