काँग्रेस आमदाराने जारी केलेल्या गोवा ऑडिओ टेप्स खऱ्या असून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे राफेल संबंधी स्फोटक माहिती आहे असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. राफेल फाईल्समुळे मनोहर पर्रिकर मोदींना वरचढ ठरु शकतात असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी आई सोनिया गांधींसोबत सध्या गोव्यात सुट्टीवर आले आहेत. राफेल संबंधीच्या गोवा ऑडिओ टेप्स रिलीज करुन ३० दिवस उलटले तरी अजून एफआयआर किंवा चौकशीचे आदेश दिलेले नाहीत. मंत्र्याविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. त्या टेप खऱ्या असून मुख्यमंत्री पर्रिकर यांच्याकडे राफेलसंबंधी स्फोटक माहिती आहे असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे.

दोन जानेवारीला काँग्रेसने राफेल संबंधी ऑडिओ टेप जारी केली. त्यामध्ये डिसेंबर २०१८ मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत मनोहर पर्रिकर यांनी आपल्याकडे राफेल संबंधीच्या फाईल असल्याचे वक्तव्य केल्याचा उल्लेख आहे. माजी काँग्रेस आमदार विश्वजीत राणे आणि अज्ञात व्यक्तीचा त्या टेपमध्ये आवाज आहे. हिवाळी अधिवेशनात राहुल यांनी लोकसभेत ही टेप वाजवण्याचा प्रयत्नही केला होता.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गोव्यात आले आहेत. तीन दिवसांच्या खासगी दौऱ्यावर असलेल्या माय-लेकांनी सी-फूडचा आनंद घेतला. अनेकांनी त्यांच्याबरोबर सेल्फीही काढून घेतली. २६ जानेवारी रोजी ते खासगी विमानाने गोव्यात आले होते.

रविवारी दुपारी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी दक्षिण गोव्यातील प्रसिद्ध फिशरमॅन्स वॉर्फ रेस्तराँमध्ये भोजनाचा आनंद लुटला. यादरम्यान सामान्य लोकांमध्ये त्यांना पाहून आश्चर्यही व्यक्त करण्यात आले. राहुल यांनी निळा टी-शर्ट परिधान केला होता. यावेळी त्यांनी अनेकांबरोबर फोटोही काढून घेतला.