अमेरिकेत उपचारांसाठी गेलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे गुरुवारी संध्याकाळी भारतात परतले आहेत. अमेरिकेतून विमानाने त्यांचे थेट मुंबईत आगमन झाले, त्यानंतर ते गोव्याकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी गोवा सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक होईल, भाजपाच्या नेत्यांनी ही माहिती दिली.


पर्रिकरांचे मुंबईत आगमन झाले तेव्हा अमेरिकेतून मुंबईपर्यंतच्या प्रवासात त्यांच्यासोबत त्यांचे कुटंबिय, वैद्यकीय पथक आणि मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी होते. मुंबईत उतरल्यानंतर ते गोव्यासाठी दुसऱ्या विमानाने रवाना होणार आहेत. त्यानंतर गोव्यात त्यांच्या स्वागतासाठी अतिरिक्त पोलिस अधिकारी दाबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळावर हजर असतील. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ते मुख्यमंत्री कार्यालयाचा कारभार हाती घेणार असून त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठकही पार पडेल.

स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार घेण्यासाठी अमेरिकेत गेलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर याच आठवड्यात गोव्यात परततील, अशी माहिती गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती, त्यानुसार त्यांचे आज मुंबईत आगमन झाले.

उपचारांसाठी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी आपल्या अनुपस्थितीत राज्याचा कारभार सुरळीत चालावा यासाठी पर्रिकर यांनी कॅबिनेट सल्लागार समितीची स्थापना केली होती. या समितीमध्ये सुदीन ढवळीकर (महाराष्ट्र गोमंतक पक्ष), फ्रान्सिस डिसूजा (भाजपा) आणि विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड पार्टी) यांचा या समितीत समावेश होता.