इंधनाच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदमध्ये इतर विरोधी पक्षांसह दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीचाही सहभाग होता. मात्र, आम्ही मोदी सरकारच्या धोरणांविरोधात बंदमध्ये सहभागी झालो होतो, याचा अर्थ आमचं काँग्रेसला समर्थन आहे असा होऊ शकत नाही, असं आम आदमी पार्टीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

आपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी राजघाटावर काँग्रेसच्या आंदोलनात सहभाग घेतला होता, तर पक्षाच्या अन्य नेत्यांनीही जंतर-मंतरवर आंदोलन केलं. यावेळी बोलताना सिंह म्हणाले की, ‘देशाच्या हितासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. इंधन दरवाढीला मोदी सरकारची चुकीची धोरणं जबाबदार असून त्यामुळेच इंधानांचे दर वाढत आहेत. आम्ही देशाच्या हितासाठी आणि मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध करण्यासाठीच भारत बंदमध्ये सहभागी झालो. याचा अर्थ आमचं काँग्रेसला समर्थन आहे असा होऊ शकत नाही. सर्व राजकीय पक्षांनी याविरोधात देशाच्या हितासाठी एकत्र यायाला हवं’.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने काँग्रेसकडून सोमवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. काँग्रेसच्या या बंदला २१ विरोधी पक्षांनी समर्थन देत आंदोलनात भाग घेतला होता. यावेळी अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना झाल्याचंही समोर आलं.