तेलगू देसम पक्षाने भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) रामराम केल्याने मोदी सरकारला हादरा बसला आहे. भाजपाने आंध्र प्रदेशमधील जनतेची फसवणूक करत राज्यावर अन्याय केला, अशी टीका चंद्राबाबू नायडूंनी केली आहे. चंद्राबाबूच्या सोडचिठ्ठीमुळे एनडीएचे संख्याबळ घटले आहे.

शत प्रतिशत भाजपाच्या स्वप्नपूर्तीसाठी मित्रपक्षांकडे दुर्लक्ष करण्याचे मोदी-शहा जोडीचे धोरण आहे. १९९८ च्या तुलनेत २०१४ मध्ये  भाजपाच्या मित्रपक्षांची संख्या १२ने वाढून २८वर पोहोचली होती. यातील अनेक पक्षांची ताकद मर्यादित आहे. सहा पक्ष तर लोकसभेच्या रिंगणात उतरलेही नव्हते, ११ पक्षांचे लोकसभेची एक जागा जिंकण्याएवढेही बळ नव्हते. पण यातील काही महत्त्वाचे राजकीय पक्ष आता भाजपाची साथ सोडून जात आहेत. भाजपाची साथ सोडणाऱ्या पक्षांचा घेतलेला हा आढावा…

१. तेलगू देसम पक्ष
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने केली होती. यासाठी मुख्यमंत्री नायडू हे मोदी सरकारकडे पाठपुरावा करत होते. मात्र, मोदी सरकारने त्यांची मागणी अमान्य केली आणि भाजपा- तेलगू देसमच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला. तेलुगू देसमचे लोकसभेत १६ तर राज्यसभेत ६ खासदार आहेत. तेलगू देसम पक्ष सत्तेत असून प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यांवरुन हा पक्ष सत्तेत आला. आता त्याच मुद्द्याशी तडजोड करणे हे तेलगू देसमला अडचणीचे ठरत होते. यात भर म्हणजे भाजपाकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे तेलगू देसम पक्षातही नाराजी होतीच.

२. शिवसेना</strong>
महाराष्ट्रात भाजपा- शिवसेना युतीचे सरकार असून लोकसभेत शिवसेनेचे १८ खासदार निवडून गेले आहेत. सत्तेत असूनही भाजपावर टीका करण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही. तर दुसरीकडे वेळोवेळी शिवसेनेची कोंडी करण्याचे प्रयत्नही भाजपा नेत्यांकडून होताना दिसतात. यात भर म्हणजे शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपाने थेट नारायण राणेंशी जवळीक साधली. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर  शिवसेनेही आता विधानसभा व लोकसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेना अजूनही भाजपासोबत सत्तेत असल्याने त्यांच्यावर टीका देखील होत आहे. आता चंद्राबाबूंप्रमाणे शिवसेनादेखील सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस दाखवेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

३. जितनराम मांझी
तीन वर्षांपूर्वी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस महाआघाडीला शह देण्यासाठी भाजपाने माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांना सोबत घेतले. संयुक्त जनता दलातून हकालपट्टी झाल्यावर जितनराम मांझी यांनी ‘हिंदुस्थानी अवाम मोर्चा’ या पक्षाची स्थापना केली. मात्र, निवडणुकीनंतर बिहारमधील राजकीय समीकरण बदलले. नितीशकुमार यांचा जदयू आणि भाजपा यांच्यात पुन्हा युती झाली आणि दोघांनी नव्याने संसार थाटला. ज्या नितीशकुमारांविरोधात जितनराम मांझींनी बंड केले होते, तेच नितीशकुमार पुन्हा भाजपासोबत आल्याने मांझी यांची कोंडी झाली. मांझी राज्यसभेतील एका जागेसाठी आग्रही होते. मात्र, भाजपाकडून प्रतिसाद न मिळाल्याने ते देखील ‘रालोआ’तून बाहेर पडले.

४. नागा पीपल्स फ्रंट
नागालँडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची नागा पीपल्स फ्रंटसोबत (एनपीएफ) जागावाटपावरून बोलणी फिसकटली आणि १५ वर्षांपासूनच्या संसारापासून भाजपाने घटस्फोट घेतला. एनपीएफमधून फुटून निघालेले माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नेपीयू रीयो यांनी नुकतेच स्थापन केलेल्या नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) यांच्याशी भाजपाने घरोबा केला. यानंतर मेघालयात एनपीएफने भाजपाशी काडीमोड घेतला.