“मोहम्मद अली जिना हे अभ्यासू होते, जर आपण त्यांना पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतला असता तर देशाची फाळणीच झाली नसती “, भाजपाचे मध्य प्रदेशमधील रतलाम-झाबुआ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार गुमानसिंग दामोर यांनी असे म्हटले आहे.

मतदार संघातील प्रचार रॅली दरम्यान बोलतांना गुमानसिंग यांनी म्हटले की, भारत स्वतंत्र झाला त्यावेळी जर नेहरूंनी हट्टीपणा केला नसता तर, या देशाचे विभाजन झाले नसते. मोहम्मद अली जिना एक कायदेपंडित, विद्वान होते. त्यावेळी जर त्यांना पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतला असता तर, देशाचे तुकडे झाले नसते. त्यामुळे फाळणीसाठी काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसची हीच विचारसरणी अजुनही कायम आहे हे दुर्देवी आहे.

तर प्रदेश काँग्रेसच्या माध्यम प्रमुख शोभा ओझा म्हणाल्या की, भाजपकडून अशा प्रकारच्याच वक्तव्याची अपेक्षा आहे, हे काही नवीन नाही. एसपी मुखर्जी, सावरकर, आडवाणी, जसवंत सिंह आणि मोदी यांनी या अगोदरच त्यांचे पाकिस्तान आणि जिना बद्दलचे प्रेम दाखवून दिलेले आहे. आडवाणींनी जिनांच्या कबरीसही भेट दिली आहे, तर जसवंत सिंह यांनी जिनांवर पुस्तक लिहून त्यात त्यांची स्तुती केली आहे. नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी त्यांना भारतात भाचपाचे सरकार पाहायचे आहे असे म्हटले होते, याकडेही ओझा यांनी लक्ष वेधले.