‘डेटिंग’च्या निर्णयानंतर जोडप्यांचे जनुकीय संशोधन

ज्या पुरुषांमध्ये सामाजिक वर्चस्व किंवा नेतृत्वगुणाशी निगडित जनुकीय तत्त्व अधिक असते ते स्त्रियांच्या दृष्टीने जास्त आकर्षक जोडीदार असतात. त्या उलट ज्या स्त्रिया संवेदनशील व विनम्र वृत्ती दाखवतात त्या पुरुषांना आकर्षित करीत असतात, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

‘हय़ूमन नेचर’ नावाच्या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. त्यात म्हटल्यानुसार महिला व पुरुष काही जनुकीय निकषांच्या आधारे एकमेकांना आवडत असतात. जोडीदार निवडण्याच्या प्रक्रियेवर जनुकीय गुणतत्त्वांचा प्रभाव पडतो का, यावर आयर्विन    येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाने संशोधन केले आहे. कॅरेन वू यांच्या नेतृत्वाखाली ‘स्पीड डेटिंग’ प्रयोगांमध्ये काही निष्कर्ष सामोरे आले आहेत. या प्रयोगात सहभागी स्त्री-पुरुषांना अवघी काही मिनिटे देऊन कमी काळासाठी व जास्त काळासाठी जोडीदार निवडण्याची संधी देण्यात आली होती. त्याचबरोबर दुसऱ्यांदा ‘डेटिंग’ करायचे की नाही याचा निर्णय घेण्यास सांगण्यात आले होते. यात २६२ आशियायी अमेरिकन लोक सहभागी झाले. त्यात स्त्री व पुरुषांना एकमेकांशी ‘डेटिंग’साठी तीन मिनिटे देण्यात आली होती.

‘स्पीड डेटिंग’मधील सहभागीदारांना असे विचारण्यात आले, की तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर परत ‘डेटिंग’ला जायला आवडेल का, एखादा जोडीदार रोमँटिक आहे असे तुम्ही कुठल्या निकषावर ठरवता. यात सहभागी व्यक्तींना त्यांचे जोडीदार आवडत असतील तर दुसऱ्या डेटसाठी त्यांनी संपर्क माहिती द्यावी असे सांगण्यात आले होते.

आता ही वस्तुनिष्ठ व सामान्य माणसाच्या पातळीवरची माहिती गोळा केल्यानंतर या लोकांच्या डीएनए नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले. त्यात सामाजिक गतिशीलतेशी निगडित असलेल्या दोन जनुकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यात एका पॉलीमॉर्फिझममध्ये सामाजिक वर्चस्व व नेतृत्वगुणाशी संबंधित जनुकांचा संबंध स्त्रियांनी निवडलेल्या पुरुष जोडीदारात दिसून आला. पुरुषांनी ज्या स्त्रियांची जोडीदार म्हणून निवड केली होती त्यात ओपिऑइड रिसेप्टर जनुकांशी संबंध दिसून आला. ज्या स्त्रियांमध्ये सामाजिक पातळीवरील आनंद व दु:ख यांची संवेदनशीलता जास्त आहे व ज्या विनम्र आहेत त्यांची निवड पुरुषांनी केली होती. महिला व पुरुष यांच्यात वरील गुणांशी संबंधित जनुके असतील तर त्यांच्या जोडय़ा जमल्या होत्या. त्यांनी एकमेकांना दुसऱ्या डेटिंगसाठी संधी दिली होती. कमी काळाच्या व दीर्घकालीन डेटिंगमध्ये हे घटक लागू असल्याचे दिसून आले.