बाबरी मशीद ज्यांच्या कारकिर्दीत पाडली गेली ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांचा ‘जनक्रांती पक्ष (राष्ट्रवादी)’ सोमवारी भारतीय जनता पक्षात विलीन झाला. पक्षांतरबंदी कायद्यामुळे इटा येथून लोकसभेवर निवडून गेलेले कल्याणसिंग हे स्वत: मात्र तूर्तास अपक्षच राहिले आहेत!
कल्याण सिंग यांचे पुत्र राजवीर यांनी एका मेळाव्यात आज विलीनीकरणाची घोषणा केली. त्यावेळी  पक्षाध्यक्ष नितीन गडकरी, राजनाथ सिंग, मुख्तार अब्बास नक्वी, उमा भारती, कलराज मिश्रा आणि विनय कटियार हे भाजपचे बडे नेते आवर्जून उपस्थित होते.
या मेळाव्यानंतर कल्याण सिंग म्हणाले की, मला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार असल्याने या घडीला मी भाजपात प्रवेश केलेला नाही. २०१४ च्या निवडणुकीला काहीच महिने उरले आहेत त्यामुळे फेरनिवडणूक टाळण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे.
दहशतवादी कृत्यात भाजप आणि संघ असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांचे वक्तव्य हे हिंदूंच्या भावना दुखावणारे व मुस्लीम समाजाचे लांगूलचालन करणारे आहे. त्याबद्दल पंतप्रधान मनमोहन सिंग व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
उत्तर प्रदेशात दहावी झालेल्या ३० हजार मुस्लीम मुलींना अखिलेश यादव सरकार सायकलवाटप करीत आहे. या योजनेला आपला विरोध नाही. पण हिंदू मुलींचा गुन्हा काय की त्यांना या सायकली मिळू नयेत, असा सवालही त्यांनी केला.
संघाचे संस्कार माझ्या रक्तातून वाहात आहेत आणि माझे प्राण गेले की माझा देह भाजपच्या ध्वजात गुंडाळावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. आपण भाजपत प्रवेश करू आणि अखेरच्या श्वासापर्यंत भाजपमध्येच राहू, असेही त्यांनी सांगितले.