News Flash

‘आम्ही पश्तुनिस्तान लिबरेशन आर्मी बनवणार’

पाकिस्तानविरूध्द आणखी एक आघाडी

'पाकिस्तानच्या अत्याचारांना आता सशस्त्र विरोध'

दक्षिण आणि मध्य आशियामधल्या दहशतवादाचं प्रमुख केंद्र असणाऱ्या पाकिस्तानमधल्या अंतर्गत अस्थिरतेमध्ये आणखी वाढ झालीये. तालिबान, अल कायदा, आणि बलुचिस्तानी फुटीरतावादामुळे मेटाकुटीला आलेल्या पाकिस्तानविरूध्द पाकिस्तानातच आणखी एक आघाडी उघडण्यात आलीये. पश्तून नेता उमर खतक याने त्याचा गट ‘पश्तुनिस्तान लिबरेशन आर्मी’ स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं. एएनआयशी बोलताना त्याने पाकला हा इशारा दिला.

पाकिस्तानची निर्मितीच साम्राज्यवादी देशांच्या राजकारणातून कृत्रिमपणे आणि कमालीच्या कुटिलतेने झाली असल्याचा दावा खतकने केला. पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी या संपूर्ण प्रदेशात राहणाऱ्या वेगवेगळ्या समाजांच्या इच्छा-आकांक्षांचा विचार केला गेला नसल्याचा आरोप उमर खतकने केला.

“पाकिस्तानने शेकडो पश्तून मुलींना लाहोरमध्ये बंदी बनवलं असून पाकिस्तानी सैन्याकडून त्यांच्यावर प्रचंड अत्याचार होत आहेत.” खतक म्हणाला “गेली अनेक दशकं पाकिस्तानने आम्हाला मूर्ख बनवलंय. आम्हाला आमच्याच जमिनीपासून तोडत पाकला आमच्या प्रदेशात दहशतवादी तळ बनवायचे आहेत.”

पश्तून नेत्यांनी पाकविरोधी एवढी टोकाची प्रतिक्रिया देण्याची अलीकडची ही पहिलीच वेळ आहे.

 

पाकिस्तानविरोधात आम्ही पश्तुनिस्तान लिबरेशन आर्मी  स्थापन करणार असल्याचं त्याने जाहीर केलं. आमचा लढा आता सशस्त्र मार्गाने होणार असून जागतिक समुदायाने आम्हाला आमचे हक्क मिळवून द्यायला आम्हाला पाठिंबा द्यावा असं आवाहन उमर खतकने केलं

या नव्या घोषणेमुळे दहशतवादाला प्रोत्साहन देणारं पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी सैन्याची डोकेदुखी वाढणार आहे. पाकिस्तान- अफगाणिस्तान सीमेवरच्या स्वात, वझिरीस्तान भागावर पाक सरकारचं कोणतंही नियंत्रण नाही. बलुचिस्तान भागातल्या फुटीरतावाद्यांनी आधीच शस्त्रं हातात घेतली आहेत. आता पश्तून समाजातही असा विचार बळावला तर परिस्थिती विचित्र होणार आहे.

 

पश्तुनिस्तान म्हणजे काय रे भावा?

टीप: हा नकाशा तंतोतंत नाही टीप: हा नकाशा तंतोतंत नाही

 

1947 साली जेव्हा भारत-पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा अफगाणिस्तान आणि नव्याने निर्माण झालेला पाकिस्तान यांच्यामधली सीमा आखताना तिथल्या सामाजिक परिस्थितीचा विचार, याविषयीचा निर्णय लादणाऱ्या युरोपियनांनी फारसा केला नव्हता. वायव्य सरहद्द प्रांत विभागताना आपल्याकडच्या पंजाबप्रमाणे एकच समाज थेट दोन देशामध्ये विभागला गेला. पाक-अफगाण सीमेलगतच्या वझिरीस्तान, खैबर-पख्तुनख्वा भागात ही परिस्थिती फार भयानक आहे. भारतासारखी राज्यव्यवस्थेची मजबूत चौकट या प्रदेशात प्रस्थापित झालेली नसल्याने इथल्या सीमा फक्त कागदावर राहिल्यात आणि इथल्या समाजांनी शतकांपासून चालत आलेले अापले व्यवहार चालू ठेवले. वरच्या नकाशात नारिंगी रंगाने दाखवलेल्या प्रदेशात पश्तून समाज मोठ्या प्रमाणावर राहतो. गेल्या सात-आठ दशकं आखलेल्या कृत्रिम सरहद्दींच्या  दोन्ही बाजूंना पश्तून समाज अनेक शतकं राहतोय. दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या पाकिस्तानच्या धोरणामुळे नेमक्या याच प्रदेशात दहशतवादी संघटनांचा सुळसुळाट झालाय. पाक सरकार आणि दहशतवादी अशा दोन्ही बाजूंनी कात्रीत सापडलेला पश्तून समाज गेली कितीतरी वर्षं त्रास सहन करतोय. या पार्श्वभूमीवर या समाजाने सशस्त्र लढा सुरू केला तर पाकसाठी ती एक मोठी डोकेदुखी ठरणार हे निश्चित

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 12:38 pm

Web Title: pashtun leader threatens armed struggle against pakistan
Next Stories
1 जवानांना सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी
2 जेवणाच्या निकृष्ट दर्जाची सीबीआय चौकशी करा; बीएसएफ जवानाच्या पत्नीची मागणी
3 रिझर्व्ह बँकेच्या कारभारातील हस्तक्षेप थांबवा; कर्मचाऱ्यांचा उर्जित पटेलांना निर्वाणीचा इशारा
Just Now!
X