ऑस्ट्रेलियाच्या व्हर्जिन कंपनीचे विमान इंडोनेशियातील बाली बेटांकडे जात असताना एका दारुडय़ा प्रवाशांनी कॉकपीट फोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. विमान ब्रिस्बेन येथून बाली येथे जात असताना हा प्रकार घडला, त्या वेळी प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला.
सुरक्षा दलांनी ७३७-८०० हे विमान बाली बेटांवर येताच गराडा घातला, कारण बालीकडे जाणाऱ्या विमानात एक दारुडा प्रवासी आहे व तो विमान अपहरणाच्या प्रयत्नात आहे अशी माहिती त्यांना आधीच ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथून मिळाली होती.  
दरम्यान व्हर्जिन ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे, की दारुडा प्रवासी हा कॉकपीटपर्यंत गेला व धडका मारू लागला तेव्हा त्याला इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. बाली येथे व्हर्जिन ऑस्ट्रेलिया कंपनीचे अधिकारी हेरू सुदजाटमिको यांनी सांगितले, की विमानाचे अपहरण झाले नाही. हा गैरसंदेशाचा प्रकार होता. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार या प्रवाशाने कॉकपीटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, पण त्याला प्रवेश करता आला नाही. तो खूप दारू प्यायलेला होता व आक्रमक बनला होता. त्याला कर्मचाऱ्यांनी थांबवून हातकडय़ा घातल्या व जागेवर बसवले. विमान उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. गरुडा फ्लाइटमध्ये असलेल्या पलानी मोहन या व्यक्तीने सांगितले, की आमच्या विमानाच्या वैमानिकाने दुसऱ्या एका विमानाचे अपहरण होत असल्याने आपल्या विमानास उशीर होत असल्याचे जाहीर केले. बाली विमानतळावर हा प्रकार घडला तेव्हा वर्दीतील माणसे असलेले लष्करी ट्रक व पाच वाहने विमानाभोवती आली. नंतर विमानतळ बंद करण्यात आला, परंतु व्हर्जिन ऑस्ट्रेलियाचे विमान गेल्यानंतर तो पुन्हा सुरू करण्यात आला.