रात्रीच्या टॅक्सी प्रवासात जशी ड्रायव्हरबद्दल खात्री नसते तशीच प्रवाशांचीही हमी देता येत नाही. दिल्लीमध्ये एका जोडप्याने उबर चालकाची हत्याकेली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तीन तुकडे करुन ते नाल्यात फेकून दिले. राम गोविंद असे मृत टॅक्सी चालकाचे नाव आहे. गोविंदची हत्या करणाऱ्या जोडप्याला त्याची टॅक्सी पळवून ती पश्चिम उत्तर प्रदेशात विकायची होती. त्यासाठी त्यांनी गोविंदची हत्या केली.

राम गोविंद बेपत्ता झाल्यानंतर आठवडयाभराने पोलिसांनी लोनी गाझियाबाद येथून जोडप्याला अटक केली. २९ जानेवारीला गोविंदने मदनगीर ते कापाशेरा अशी ट्रीप पूर्ण केली. त्यानंतर तो गाडीमध्ये थांबला होता. त्यावेळी रात्री एकच्या सुमारास फरहात अली आणि सीमा शर्मा यांनी त्याची कॅब बुक केली.

गाझियाबाद येथे पोहोचल्यानंतर या जोडप्याने गोविंदला त्यांच्या घरी नेले व त्याला चहा दिला. रात्री थंडी असल्यामुळे गोविंदही त्यांच्या घरी यायला तयार झाला. फरहात आणि सीमाने चहामध्ये गुंगीचे औषध मिसळले होते. चहा पिऊन गोविंदची शुद्ध हरपल्यानंतर फरहातने दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी जोडप्याने गोविंदचा मृतदेह घरातच ठेवला व त्याची गाडी घेऊन मोरादाबाद येथे गेले. त्यांनी तिथे एका मंदिराजवळ झुडूपात गाडी लपवून ठेवली व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पुन्हा घरी आले.