दोन महिन्यांपूर्वी जेट एअरवेज विमानात एक धक्कादायक प्रकार घडला होता. विमानातील कर्मचारी हवेचा दाब नियंत्रित करणारा स्विच सुरु करण्यास विसरला. ज्यामुळे शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात सापडला होता. ३० ते ३५ प्रवाशांना नाकातून आणि कानातून रक्त येण्याचा त्रास झाला होता. याच घटनेत सापडलेल्या एका प्रवाशाला कायमचा बहिरेपणा आला आहे. मुकेश शर्मा असे या प्रवाशाचे नाव असून जेट एअरवेजच्या एका चुकीमुळे मुकेशला कायमचा बहिरेपणा आला आहे.

मुकेश शर्मा हा २० सप्टेंबरला याच विमानातून मुंबईहून जयपूरला निघालेल्या विमानात प्रवास करत होत. हवेचा दाब नियंत्रित न झाल्याने मुकेशच्या कानातून रक्त येऊ लागले ज्यामुळे आता त्याला कायमचा बहिरेपणा आल्याचे समोर आले आहे. मुकेश शर्मा पोर्तुगालच्या एव्हीरिओ विद्यापीठात पीएचडी रिसर्चर म्हणून काम करत आहेत. मुकेश शर्मा यांची ऑडिओमेट्री टेस्ट झाली या चाचणीनंतर मुकेश शर्मा यांना कायमचा बहिरेपणा आल्याचे स्पष्ट झाले आहे.

माझी चाचणी झाल्यानंतर मला कायमचा बहिरेपणा आल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणत्याही व्यक्तीशी समोरासमोर चर्चा करताना मला ऐकू येत नाही. मला त्यामुळे संवाद साधण्यात अडचणी येत आहेत. फोन आल्यावरही मला डाव्या कानाला फोन लावून बोलावे लागते. उजव्या कानाला फोन लावल्यास मला काहीही ऐकू येत नाही तसेच डाव्या कानानेही अत्यंत कमी प्रमाणात ऐकू येते असे मुकेश शर्मा यांनी म्हटले आहे. हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

जयपूरमध्ये डॉक्टर पवन सिंघल हे मुकेश शर्मा यांच्यावर उपचार करत आहेत. मुकेश शर्मा यांच्या प्रमाणेच अंकुर काला या प्रवाशालाही असाच त्रास झाल्याचे सिंघल यांनी म्हटले आहे. या दोन्ही प्रवांशाच्या कानात रक्तस्त्राव झाला आणि त्याचमुळे या दोघांनाही बहिरेपणा आल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. कान आणि मेंदू यांच्यात जोडलेल्या नसेवर आघात झाल्याने मुकेश शर्मा यांना कायमचा बहिरेपणा आला आहे. आता यावर उपाय योजण्यासाठी काय उपचार करता येतील? हे डॉक्टर पाहात आहेत असेही शर्मा यांनी म्हटले आहे.