विमानामध्ये एखादा प्रवासी गोंधळल्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. एका मद्यधुंद प्रवाश्याने विमान ३३ हजार फुटांवर असतानाच विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याने एकच गोंधळ उडाला. रशियामधील नॉरवींड एअरलाइन्सच्या फुकेतला जाणाऱ्या विमानामध्ये एकाच वेळी धक्कादायक घटना घडल्या. एका व्यक्तीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यामुळे उझबेकिस्तानमध्ये विमानाचे आपत्कालीन लॅण्डींग करण्यात आले. याच विमानातीन इतर दोन प्रवासी मद्यधुंद अवस्थेत एकमेकांशी भांडू लागले त्यातच एका व्यक्तीला विमानातील टॉयलेटमध्ये धुम्रपान करताना रंगेहात पकडले. विमानातील या सर्व गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

फुकेतला जाण्यासाठी रशियामधून उड्डाण घेतलेले विमान ३३ हजार फुटांवर असताना एका मद्यधुंद प्रवाश्याने विमानाचा दरवाजा घडण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यामुळेच विमानामध्ये एकच गोंधळ उडाला. विमानातील एअर होस्टेसने प्रवाशांना सीट बेल्ट बांधण्याच्या सूचना केल्या. सर्वच प्रवासी आणि विमानातील कर्मचारी या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तो अन्नपदार्थ गुंडळण्याची प्लास्टिकची पिशवी वापरुन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत कोणाचे काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हता. अखेर हे विमान उझबेकिस्तानमध्ये उतरवण्यात आले. त्यानंतर या व्यक्तीला तेथील स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेचा व्हिडिओ एका प्रवाशाने आपल्या मोबाइल कॅमेरात कैद करुन युट्यूबवर अपलोड केला आहे.

या प्रवाशाला उतरवल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि विमानाने पुन्हा उड्डाण घेतले. मात्र पुन्हा या विमानामधील दोन प्रवाशी मद्यधुंद अवस्थेत एकमेकांशी वाद घालू लागले. प्रवाशांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. त्यातच तिसरा एक प्रवासी विमानातील टॉयलेटमध्ये धुम्रपान करताना अढळून आल्याने या गोंधळात आणखीनच भर पडला. अखेर कसेबसे या विमानाने फुकेत विमानतळावर लॅण्डींग केले.

फुकेत विमानतळावर पोलिसांनी या तिघांनाही अटक केली. मात्र हा प्रवास अनेकांसाठी नकारात्मरित्या अविस्मरणीय ठरला.