विमानतळावर असणाऱ्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थाप्रमाणे रेल्वे स्थानकांवरही सुरक्षा प्रणाली लागू करण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी १५ ते २० मिनिटांपूर्वीच रेल्वे स्थानकावर पोहोचावे लागणार आहे. जेणेकरून सुरक्षेचे सर्व टप्पे पूर्ण केल्यानंतरच प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश मिळेल. यामुळे उशीर झाल्यास गाडी सोडण्याची वेळ येणार आहे.

कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर हाय अँड टेक्नोलॉजीसहीत ही व्यवस्था सध्या अलाहाबाद रेल्वे स्थानकावर लागू करण्यात आली आहे. अलाहाबादशिवाय कर्नाटकमधील हुबळी रेल्वे स्थानकातही अशाच प्रकारची सुरक्षा व्यवस्था आहे. देशातील आणखी २०२ रेल्वे स्थानकांवर अशी सुरक्षा व्यवस्था लागू करण्याची तयारी रेल्वेने सुरू केली असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) महासंचालक अरुण कुमार यांनी दिली.

यासाठी देशभरातील काही स्थानकांची पडताळणी सुरू झाली आहे. विमानतळाप्रमाणे रेल्वे स्थानक चारी बाजूंनी सुरक्षित केले जाईल. त्याचप्रमाणे तसंच स्थानकाची प्रवेशद्वारे किती आहेत आणि त्यातील किती प्रवेशद्वारं बंद करता येतील, हे पूर्ण अभ्यासानंतर ठरवण्यात येणार आहे. अनावश्यक आणि खुले मार्ग कायम स्वरूपी भिंती उभारून बंद केले जातील. उर्वरीत प्रवेशद्वारांवर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात असतील, असं अरुण कुमार म्हणाले.

रेल्वे स्थानकाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर तपासणीचे टप्पे असतील. हे सर्व टप्पे पार केल्यावरच प्रवाशांना आत प्रवेश देण्यात येईल. यामुळे विमानतळांप्रमाणेच प्रवाशांना त्यांची गाडी सुटण्याच्या वेळेच्या किमान १५ ते २० मिनिटे आधीच रेल्वे स्थानकात पोहोचावे लागेल, असे त्यांनी सांगितले. देशभरातील ज्या २०२ रेल्वे स्थानकांवर सुरक्षेची योजना आखण्यात आली आहे, तिथे इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम (आयएसएस) ही सुरक्षा यंत्रणा उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या सुरक्षा यंत्रणेत सीसीटीव्ही कॅमेरे, बॅग स्क्रीनिंग, बॉम्बशोधक आणि नाशक यंत्रणा या सर्वाचा समावेश आहे. आयएसएसची ही संपूर्ण यंत्रणा रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारांवर असेल. रेल्वे स्थानकांच्या या सुरक्षा यंत्रणेसाठी ३८५.०६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.