रस्त्यावर दोन वाहन चालकांमध्ये सुरु असलेले भांडण मिटवणे त्रयस्थ व्यक्तीच्या जीवावर बेतले. या दुर्देवी घटनेत हस्तक्षेप करणाऱ्याचा मृत्यू झाला. तेलंगणच्या हयाथनगरमध्ये मंगळवारी रात्री ही घटना घडली. रस्त्यावरील भांडणात हस्तक्षेप करणाऱ्या एस. पारामेश (३०) यांचे कार चालकाने अपहरण केले.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी रात्री आठच्या सुमारास पारमेश आणि आणखी दोघे ऑटो ट्रॉलीमधून कुंटलूर रोडवरुन जात होते. त्यावेळी तिथे दुचाकीस्वार व एका कार चालकाचे भांडण सुरु होते. त्या तिघांनी ऑटो थांबवली व भांडण मिटवण्यासाठी हस्तक्षेप केला. पारामेश आणि त्यांचा सहकारी राजू यांनी दुचाकीस्वाराला तिथून जाऊ दिले. त्यामुळे कारमधील दोघेजण खवळले. त्यांनी पारामेश व राजू सोबत वाद घातला अशी माहिती पोलिसांनी दिली.

“त्यांनी पारामेश आणि राजूला जबरदस्तीने गाडीत कोंबले व दुचाकीस्वार कुठे गेला ते दाखवा” असा जाब विचारत गाडी पळवायला सुरुवात केली. त्यांनी कारमध्ये पारामेशला मारहाण सुद्धा केली असे पोलीस निरीक्षक के.सतीश यांनी सांगितले.

कार चालक वेगाने कार पळवत होता. समोरुन येणाऱ्या वाहनाबरोबर धडक टाळण्याच्या प्रयत्नात गाडी पलटी झाली. पारामेशला या अपघातात गंभीर दुखापत झाली. अन्य तिघांना फक्त दुखापत झाली. उपचारा दरम्यान पारामेशचा मृत्यू झाला. पारामेश दरवाजा बनवणाऱ्या एका कंपनीत नोकरीला होता. तो घरी निघाला होता. अपघातानंतर कार चालक व त्याचा साथीदार कार तिथेच सोडून पळाले.