इतर राज्यांत अडकलेल्या उत्तर प्रदेशाली मजूर व कामगारांना आपल्या घरी परत आणण्यावरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून काँग्रेस पक्ष कामगारांना घरी आणण्यासाठी १ हजार बसची सोय करेल, यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली. या प्रवासाचा सर्व खर्चही काँग्रेस पक्ष घ्यायला तयार असल्याचं प्रियंका यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं. प्रियंका गांधी यांच्या पत्राची दखल घेत उत्तर प्रदेश सरकारने काँग्रेस पक्षाकडे १ हजार बस गाड्यांच्या रजिस्ट्रेशन व इतर बाबांची माहिती देण्याचं आवाहन केलं.

काही तासांनी उत्तर प्रदेश सरकारने आपल्या भूमिकेत बदल करत, सर्व बस लखनऊमध्ये अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली. ज्यावरुन काँग्रेस आणि भाजपात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली. मात्र या सर्व गदारोळात राज्याबाहेर अडकलेल्या मजुरांचा प्रश्न तसाच कायम राहिल्यामुळे अखेरीस प्रियंका गांधी यांनी, व्हिडीओ संदेशाद्वारे उत्तर प्रदेश सरकारला खास विनंती केली आहे. “सर्व बस सरकारच्या ताब्यात दिल्यानंतर आता २४ तास उलटले आहेत. तुम्हाला त्या बसवर भाजपाचा झेंडा लावायचा असेल तर लावा, या बसची सोय तुम्ही केलीत असं सांगायचं असेल तर तसंही सांगा…पण कृपया या बसचा वापर करण्याची परवानगी द्या. बाहेर अडकलेल्या कामगारांना घरी आणण्याची परवानगी द्या.”

आपण सर्वांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखणं गरजेचं आहे. बाहेर अडकलेले हे मजूर फक्त भारतीय नाहीत, तर ते भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. या मजुरांच्या परिश्रमावर हा देश चालतो. त्यांना घरी आणणं ही सर्वांची जबाबदारी आहे, ही वेळ राजकारण करायची नाही, अशा शब्दांमध्ये प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारला शालजोडीतले लगावले आहेत.

आणखी वाचा- “ही क्रूर थट्टा” : काँग्रेस आमदाराकडून प्रियांका गांधींना घरचा आहेर, योगींच कौतुक

दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री, सिद्धार्थ नाथ सिंग यांनी काँग्रेस पक्षाने दिलेल्या बसच्या रजिस्ट्रेशन नंबर व माहितीमध्ये गडबड असल्याचं पीटीआयला सांगितलं. “प्राथमिक चौकशी केली असता काँग्रेस पक्षाने आम्हाला बसच्या गाड्यांचे जे रजिस्ट्रेशन नंबर दिले आहेत, ते टू-व्हिलर, थ्री-व्हिलर आणि माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे असल्याचं स्पष्ट झालंय.” त्यामुळे बस गाड्यांवरुन सुरु झालेलं उत्तर प्रदेशातलं राजकारण कुठल्या दिशेने जातंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.