योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीचे प्रमोटर आचार्य बाळकृष्ण यांचा देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत समावेश झाला आहे. हुरून इंडिया -२०१६ यांनी प्रसिद्ध केलेल्या श्रीमंतांच्या यादीत रामदेव बाबांचे विश्वासू असलेले बाळकृष्ण हे २५ व्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही २५, ६०० कोटी रूपये इतकी सांगण्यात आली आहे. वर्ष २०१६ मध्ये एफएमसीजी विभागात पतंजलीच्या व्यवसायात सुमारे ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. पतंजली कंपनीची उलाढाल ही ५ हजार कोटी रूपये इतकी असून २०१७ मध्ये त्यात दुपटीने म्हणजे १० हजार कोटी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एफएमसीजी विभागात डाबर कंपनीचे आनंद बर्मन हे सर्वात श्रीमंत ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही ४१, ८०० कोटी रूपये इतकी आहे.
वादग्रस्त व्यक्तिमत्व
४४ वर्षीय बाळकृष्ण यांच्यावर शैक्षणिक कागदपत्रात हेराफेरी, बनावट पासपोर्ट आणि विदेशी चलन बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप होते. परंतु अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना क्लिन चिट दिली होती. बाळकृष्ण हे नेपाळचे नागरिक असून बरेली पासपोर्ट कार्यालयात हरिद्वारच्या पत्त्यावर पासपोर्ट बनवल्याची तक्रार सीबीआयकडे दाखल झाली होती. सीबीआयने त्यावेळी बाळकृष्ण यांच्या शैक्षणिक व जन्म नोंदीचे कागदपत्रे बनावट असल्याचे म्हटले होते.
बाळकृष्ण यांचे संशोधनातही मोठे योगदान आहे. त्यांनी सहलेखकांसमवेत आतापर्यंत ४१ शोधनिबंध लिहिले आहेत. हे सर्व शोधपत्र योग, आयुर्वेद आणि औषधांसंबंधी आहेत. सध्या ते पंतजलीशी संबंधित ९ पदांवर कार्यरत आहेत.
पतंजली भारतातील सर्वात वेगाने विकसित होणारा कंज्युमर ब्रँड आहे. पतंजली आयुर्वेच्या ९४ टक्क्यांपेक्षा जास्त मालकी हक्क बाळकृष्ण यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते. पतंजलीबरोबर गत दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या बाळकृष्ण यांनी २०११ मध्ये आपल्यावर ५०-६० कोटींचे वैयक्तिक कर्ज असल्याचे सांगितले होते. तसेच याशिवाय आपले वैयक्तिक बँक खाते नसल्याचाही त्यांनी खुलासा केला होता.