पतंजली आयुर्वेद लिमिटेडने करोना व्हायरसवर बनवलेल्या औषधाचे सर्व रिपोर्ट तपासल्यानंतरच सरकारकडून मंजुरी देण्यात येईल असे आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी बुधवारी स्पष्ट केले. ‘आयुष’ मंत्रालयाने पतंजलीकडे या औषधातील घटकांचा तपशील मागितला आहे.

बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं काल करोनावरील आयुर्वेदिक औषध ‘करोनिल’ लाँच केलं. केंद्र सरकारनं करोनावरील औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश पतंजलीला दिले आहेत. पतंजलीने ‘करोनिल’ औषधासंबंधी जे दावे केलेत, त्याची पडताळणी पूर्ण होईपर्यंत दिशाभूल करणाऱ्या जाहीराती बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

आणखी वाचा- “त्यांच्या लायसन्सच्या अर्जावर करोनाचा उल्लेखही नव्हता; पतंजलीला औषधाबद्दल नोटीस देणार”

“बाबा रामदेव यांनी देशाला एक नवीन औषध दिले ही एक चांगली बाब आहे. पण नियमानुसार त्यांनी सर्वप्रथम आयुष मंत्रालयाकडे यायला पाहिजे होते” असे श्रीपाद नाईक एएनआय वृत्त संस्थेशी बोलताना म्हणाले. ‘पतंजलीने मंत्रालयाला रिपोर्ट पाठवला आहे. आम्ही तो रिपोर्ट तपासल्यानंतरच परवानगी देऊ’ असे नाईक यांनी सांगितले.

आणखी वाचा- करोनावरील औषधाची जाहिरात थांबण्याचे केंद्राचे आदेश, पण पतंजली म्हणते…

पतंजलीचे काय आहे म्हणणे

‘आयुष’ मंत्रालयाने पतंजलीकडे या औषधातील घटकांचा तपशील मागितला असून, जोवर त्याची पडताळणी होत नाही, तोवर ही बंदी कायम राहणार आहे. यावर पतंजलीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. कम्युनिकेशन गॅप होती ती आता दूर करण्यात आल्याची प्रतिक्रिया पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दिली.

“हे सरकार आयुर्वेदाला चालना देणारे आहे. जी आमच्यात कम्युनिकेशन गॅप होती ती आता दूर झाली आहे. रँडमाइझ्ड प्लेसबो कंट्रोल्ड क्लिनिकल ट्रायल्सचे जे काही मापदंड आहेत ते १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहेत. याची संपूर्ण माहिती आम्ही आयुष मंत्रालयाला दिली आहे,” अशी माहिती पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दिली. त्यांनी यासंदर्भात एक ट्विटही केलं आहे.