आरक्षणाच्या मुद्दय़ावरून गुजरातमध्ये पुन्हा रणकंदन; आंदोलकांकडून जाळपोळ

पटेल समाजाला आरक्षण मिळावे, तसेच तुरुंगात असलेल्या नेत्यांची सुटका व्हावी या मागणीसाठी येथे काढण्यात आलेल्या मोर्चाला रविवारी हिंसक वळण लागले. आंदोलकांनी दोन सरकारी इमारतींना आग लावली तसेच पोलिसांच्या वाहनांची मोडतोड केली. तर पोलिसांनी केलेल्या लाठीमारात पटेल समाजाचे नेते जखमी झाले. या सर्व पाश्र्वभूमीवर आज, सोमवारी पटेल समाजातर्फे ‘गुजरात बंद’ची हाक देण्यात आली आहे.

पटेल समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन छेडणारा नेता हार्दिक पटेल सध्या तुरुंगात आहे. त्याच्यासह आणखी काही नेत्यांची सुटका व्हावी तसेच पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सरदार पटेल गटातर्फे (एसपीजी) रविवारी मेहसाणात ‘जेल भरो’ आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले. संतप्त आंदोलकांनी मेहसाणातील दोन सरकारी इमारतींना आग लावली तर पोलिसांच्या वाहनांची मोडतोड केली. तसेच जमावाने केलेल्या दगडफेकीत उपदंडाधिकारी व महसूल अधिकारी जखमी झाले. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात एसपीजीचे नेते लालजी पटेल जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. आतापर्यंत १५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, मेहसाणामध्ये सोमवार सकाळपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

लोण पसरले

मेहसाण्यात झालेल्या आंदोलनाचे लोण सुरतपर्यंत पोहोचले. तेथे पटेल समाजाच्या ४३५ लोकांनी रस्त्यावर मेहसाण्यातील घटनेचा निषेध केला. त्यानंतर आंदोलनाचे हे लोण राजकोटसह अन्य शहरांतही पसरले. त्यामुळे सुरत व राजकोट येथील मोबाइल व इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्या.