आज अधिकृत घोषणा

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर आल्यास पटेलांना आरक्षण देण्याबाबत आमच्यात एकमत झाले आहे, असे गुजरात काँग्रेस आणि हार्दिक पटेल याच्या नेतृत्वातील पाटीदार अनामत आंदोलन समिती (पास) यांनी रविवारी सांगितले.

या आरक्षणाबाबतचे तपशील आणि निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत ‘पास’ची भूमिका याबाबत हार्दिक पटेल सोमवारी राजकोटमध्ये होणाऱ्या जाहीर सभेत घोषणा करणार असल्याचे ‘पास’चे संयोजक दिनेश भंभानिया यांनी या मुद्यावरील एका महत्त्वाच्या बैठकीनंतर सांगितले. हार्दिक पटेल मात्र या बैठकीत उपस्थित नव्हता.

पाटीदारांना घटनात्मकदृष्टय़ा वैध रीतीने आरक्षण कशा प्रकारे द्याल असे आम्ही यापूर्वी काँग्रेसला विचारले होते. आज आम्ही या प्रश्नावर महत्त्वाची बैठक घेतली आणि काँग्रेसने आमच्यासमोर ठेवलेल्या विविध पर्यायांवर आमची सहमती झाली.

‘पास’ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष भरतसिंह सोळंकी यांच्यासह ज्येष्ठ नेते हजर होते. ही बैठक यशस्वी ठरून त्याचे सकारात्मक फलित मिळाले.

‘पास’ चे नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांची एका आठवडय़ापूर्वी या मुद्यावर बैठक झाली होती. यानंतर, सत्तेवर आल्यास पक्ष पटेलांना कशा प्रकारे आरक्षण देईल याबाबत काँग्रेसने दिलेल्या तीन पर्यायांबाबत आपण समाधानी असल्याचे हार्दिकने सांगितले होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची निवडणुकीतून माघार

अहमदाबाद : विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा गुजरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी यांनी रविवारी केली. पक्षाच्या उमेदवार निवडीबाबत नाराज असल्याचे वृत्त मात्र त्यांनी फेटाळले. काही जणांनी माझ्याविरोधात जरी मोहीम सुरू केली असली तरी त्यात तथ्य नाही. महत्त्वाचे निवडणुकीचे काम असल्याने केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सोडून गुजरातला परतल्याची सारवासारव त्यांनी केली. पक्षाने मला खूप काही दिले आहे. दोन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली असून, मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती सांभाळल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक लढविणार नसल्याने काँग्रेस सत्तेत आल्यास मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतूनही माघार घेतली काय, असे विचारता ते पक्ष नेतृत्व ठरवेल असे उत्तर सोळंकी यांनी दिले.

उमेदवारीवरून भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने

अहमदाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीवरून भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी रविवारी राज्य कार्यालयाबाहेर निदर्शने केली. १८२ जागांपैकी १०६ उमेदवारांची घोषणा पक्षाने केली आहे. काही आमदारांना पुन्हा उमेदवारी दिल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. भाजपच्या पाटणचे खासदार लीलाधर वाघेला यांनी मुलाला उमेदवारी न दिल्यास राजीनाम्याची धमकी दिली आहे. दिसा मतदारसंघातून त्यांचा मुलगा दिलीप यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे.

विजय रुपानी यांची केशुभाईंशी चर्चा

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी सोमवारी राजकोट पश्चिम मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी रविवारी येथे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांची भेट घेतली. केशुभाई हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो असे रुपानी यांनी भेटीनंतर स्पष्ट केले. केशुभाई पटेल यांनी गेल्या निवडणुकीत गुजरात परिवर्तन पक्ष स्थापन करून निवडणूक लढविली होती. मात्र नंतर त्यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला होता.