भारतीय हवाईदलाच्या पठाणकोट येथील तळावर झालेला दहशतवादी हल्ला म्हणजे पाकिस्तानची प्रतिमा डागाळण्यासाठी भारतानेच रचलेला बनाव असल्याचा कांगावा पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी केला आहे.

या हल्ल्याचा तपास करत असलेल्या पाकिस्तानी पथकातील एका सदस्याचा हवाला देऊन ‘पाकिस्तान टुडे’ या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, पठाणकोट हल्ला म्हणजे भारताचा पाकिस्तानविरुद्ध खोडसाळ प्रचार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची बदनामी करण्यासाठी भारतानेच हा सगळा बनाव रचला होता. भारताला दहशतवाद्यांची आगाऊ माहिती होती. हल्ल्यानंतर काही तासांतच दहशतवादी मारले गेले होते. पण भारतीय सुरक्षा दलांनी पुढील तीन दिवस कारवाईचे नाटक करून त्याला मोठे स्वरूप दिले. पठाणकोट हल्ल्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याची शनिवारी उत्तर प्रदेशमध्ये गोळ्या झाडून हत्या झाली. त्यावरून हेच दिसते की भारतीय प्रशासनाला हे प्रकरण झाकून टाकायचे आहे, असेही वृत्तात म्हटले आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी या वृत्ताला नकार दिला असून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयात टिकू शकतील असे अनेक पुरावे दिले असल्याचे सांगितले.