पठाणकोट येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांना संपूर्ण लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी या शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो लोक एकत्र आले होते, त्यावेळचे दृश्य मन हेलावून टाकणारे होते. देशासाठी बलिदान केलेल्या या जवानांना भारत माता माता की जय या घोषणांच्या निनादात अखेरचा निरोप दिला गेला. गरुड कमांडो गुरुसेवक सिंह यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळलेले होते. नोव्हेंबरमध्ये विवाह झालेल्या गुरुसेवक यांचे पार्थिव अंबालातील गरनाळा या मूळ गावी आले तेव्हा कुटुंबीयांना शोकावेग अनावर झाला. हरयाणाचे मंत्री अनिल वीज व अभिमन्यू यावेळी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांसह उपस्थित होते. बॉम्बतज्ज्ञ असलेले लेफ्टनंट कर्नल इ. के. निरंजन यांचाही पठाणकोट येथील हल्ल्यात स्फोटके निकामी करताना मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव बंगळुरू येथे आणण्यात आले. नंतर ते केरळातील पलक्कड या त्यांच्या मूळ गावी नेले जाणार आहे. त्यांचे कुटुंबीय पार्थिवाजवळ बसले तेव्हा त्यांचे डोळे पाणावले. त्याला लष्करात काम करण्याची आवड होती. त्याच्या त्यागाचा मला अभिमान आहे, असे निरंजनचे वडील शिवराजन यांनी सांगितले. निरंजन यांच्या बहिणीने सांगितले की, कर्मभूमीसाठी लढणाऱ्या अर्जुनासारखाच तो होता असे मला वाटते. निरंजन पलक्कडचे होते व त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. राधिका व १८ महिन्यांची मुलगी आहे. अनेक लष्करी अधिकारी व प्रतिष्ठित व्यक्तींनी निरंजनला श्रद्धांजली वाहिली. निरंजन ३२ वर्षांचे होते व त्यांचे कुटुंबीय बंगळुरूला असते. २००४ मध्ये ते इंजिनियर रेजिमेंटमध्ये भरती झाले. ते एनएसजीच्या बॉम्ब पथकाचे प्रमुख होते. पठाणकोट येथे हवाई तळावर बॉम्ब निकामी करताना त्यांचा मृत्यू झाला.
राष्ट्रकुल स्पर्धेतील नेमबाज पदकविजेते व आता हुतात्मा झालेले सुभेदार फतेह सिंह (वय ५१) यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंजाबमध्ये गुरुदासपूर येथे हजारो लोक जमले होते. वडिलांचे पार्थिव स्मशानभूमीकडे नेताना त्यांची मुलगी मधू सैनिकांसोबतच होती. माझ्या वडिलांनी आज जे केले त्याची कशाशी तुलना करता येईल असे मला वाटत नाही. मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे असे मधू हिने सांगितले.