पठाणकोट दहशतवादी हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदला पाकिस्तानी सरकार किंवा सरकारशी संबंधित संस्थेने मदत केली नव्हती, असे विधान करून राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख शरद कुमार यांनी वाद निर्माण केला आहे.
हल्ल्यात पाकिस्तानी नागरिकांचा सहभाग हे उघड सत्य आहे असे म्हणत परराष्ट्र मंत्रालयाने त्याचा प्रतिवाद केला. नंतर एनआयएने या विधानावरून माघार घेतली असली तरी पाकिस्तान सरकारने लगेचच हे विधान म्हणजे त्यांच्या जुन्या भूमिकेवरील शिक्कामोर्तब असल्याचे म्हटले.
कुमार यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या लेखी मुलाखतीत हे विधान असल्याचे म्हटले जाते. त्यावरून हे वादंग माजले. नंतर एनआयएने कुमार यांच्या विधानाचा विपर्यास केला गेल्याचे प्रसिद्धीपत्रकातून जाहीर केले.