भारतात पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात पाकिस्तानने तीन संशयितांना अटक करून दहशतवादविरोधी न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. प्राथमिक माहिती अहवाल दाखल केल्यानंतर काही दिवसांनी ही कारवाई झाली आहे.
पंजाब प्रांतातील गुजरावाला येथे दहशतवाद विरोधी न्यायालयाचे न्या. बुशरा झमान यांनी खालीद महंमद, इर्शादउल हक व महंमद शोएब यांना सहा दिवसांची कोठडी देण्यात आली.
डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार या तीन जणांना दहशतवाद विरोधी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ते भारतात पठाणकोट येथील हवाईतळावर २ जानेवारीला झालेल्या हल्ल्यात सामील होते असे सांगण्यात आले. दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना चौकशीसाठी अज्ञात ठिकाणी नेण्यात आले होते, त्यांनी त्यांच्यावरचे आरोप नाकारले आहेत. गुजरावाला येथे अज्ञात हल्लेखोरांविरोधात या महिन्यात प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला होता. कलम ३०२, ३२४ व १०९ या पाकिस्तानी दंड संहितेतील कलम व दहशतवादविरोधी कायद्यातील कलमे ७ व २१ आय अन्वये प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्यात आला होता. या तिघांना केव्हा अटक करण्यात आली हे समजू शकलेले नाही. त्यांना प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यापूर्वी अटक केली असल्याचे समजते. त्यांच्याविरोधात काही पुरावेही गोळा करण्यात आले आहेत. जैश ए महंमदचे संशयित अतिरेकी पठाणकोट हवाईतळावर २ जानेवारीला घुसले होते.