पठाणकोट हवाई दलाच्या तळावर हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचे सिव्हिल रुग्णालयात ठेवण्यात आलेले मृतदेह तेथून अन्यत्र हलवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सिव्हिल रुग्णालयाच्या शवागारात जागा नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे.
जवळपास गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून हे मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत. मात्र जागेचा अभाव असल्याने हे मृतदेह अन्यत्र हलवावे, अशी मागणी आम्ही केल्याचे सिव्हिल सर्जन अजय बग्गा यांनी म्हटले आहे. शवागारात केवळ पाच मृतदेह ठेवता येतील इतकीच जागा असून चार दहशतवाद्यांचे मृतदेह तेथे असल्याने आता केवळ एकच जागा उरलेली आहे, असे बग्गा म्हणाले. हे मृतदेह अमृतसर, पतियाळा अथवा फरिदकोट येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविणे शक्य आहे, असेही ते म्हणाले. या बाबत रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी पंजाबचे प्रधान सचिव (आरोग्य) विन्नी महाजन, आरोग्य संचालक एच. एस. बाली आणि पठाणकोटचे उपायुक्त यांना पत्राद्वारे कळविले आहे. प्रधान सचिवांनी या बाबत राज्याचे पोलीस महासंचालक सुरेश अरोरा यांच्याशी चर्चा केली आहे, असे बग्गा म्हणाले.