पंजाबमधील पठाणकोट हल्ल्यातील संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी अपेक्षा अमेरिकेने व्यक्त केली आहे. दरम्यान कालच भारताने दहशतवाद्यांबाबतचे पुरावे पाकिस्तानला दिले असून त्यावर आम्ही काम करीत आहोत, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानने दिली आहे. पाकिस्तानने आता बोलल्याप्रमाणे कृती करून या हल्ल्यातील संबंधितांवर कारवाई करावी, असे अमेरिकेने बजावले आहे.
अमेरिकी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जॉन किरबी यांनी सांगितले की, पाकिस्तान सरकारने याबाबत ठोस वक्तव्य केले आहे हे ठीक असले, तरी प्रत्यक्षात तो देश पठाणकोट हल्ल्याशी संबधितांवर कारवाई करील अशी आमची अपेक्षा आहे. भारताने या दहशतवादी हल्ल्यांबाबत जे पुरावे दिले आहेत त्यावर आम्ही काम करीत आहोत असे पाकिस्तानने कालच सांगितले होते.
दक्षिण आशियात दहशतवादाचा धोका मोठा आहे व ते एक आव्हानच आहे, दक्षिण आशियातील सर्व देशांनी एकत्र येऊन दहशतवाद्यांचे तळ नष्ट करावेत, असे आवाहन आम्ही करीत आहोत व पठाणकोट हल्ल्यातील संबंधितांना शिक्षा झाली पाहिजे, अशी अमेरिकेची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेधही केला आहे. दहशतवादी गटांवर कारवाई चालू राहील असे आश्वासन अमेरिकेला पाकिस्तानने दिले आहे. दहशतवाद विरोधी कारवाई करताना पक्षपात होता कामा नये, दहशतवाद हे संयुक्त आव्हान असून ते सर्वानीच स्वीकारले पाहिजे.
पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा मुद्दा आम्ही अनेकदा उपस्थित केला आहे, पाकिस्तान सरकारला हा आश्रय थांबवण्यासाठी राजी करण्याचे काम आम्ही शेवटपर्यंत करीत आहोत. पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करताना त्यात पक्षपात करता कामा नये, प्रत्येक देशाने दहशतवाद्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे कारण ते एक मोठे आव्हान आहे, असे त्यांनी सांगितले.