पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावरील हल्ल्याप्रकरणी केंद्र सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. पठाणकोटमधील एअरबेस कमांडरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकारने पठाणकोट हल्ल्याप्रकरणी कारवाई केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकार्यक्षम अधिकाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. यानुसार पठाणकोट हल्ल्याप्रकरणी सुरक्षेतील हलगर्जीपणाबद्दल एअरबेस कमांडरवर कारवाई करण्यात आली आहे. हवाई दलाने यासंदर्भात एक चौकशी समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणात सुरुवातीला चौकशी समिती नेमली जात नव्हती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. ज्या पद्धतीने हा हल्ला हाताळण्यात आला त्यावर मोदींनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त होते. शेवटी हवाई दलातील वरिष्ठ अधिकारी अमित देव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने तळाच्या सुरक्षेसाठी नेमलेले अधिकारी आणि जवान तळाचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला होता. गुप्तचर यंत्रणांकडून वारंवार हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतरही सुरक्षा व्यवस्थेत उणीवा होत्या असे चौकशी समितीच्या निदर्शनास आले. याप्रकरणात  अधिकारी आणि काही जवानांना शिक्षा म्हणून त्यांची बढती रोखण्याची शिफारसही समितीने केली होती.

जानेवारी २०१६ मध्ये पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर चार दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सुरक्षा दलाचे जवानही शहीद झाले होते. या हल्ल्यात सुरुवातीपासूनच एअरबेसवरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. जैश ए मोहम्मद या संघटनेने हा दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पठाणकोट येथे हवाई तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा मुकाबला करण्याच्या मोहिमेत काही उणिवा राहून गेल्या अशी कबुली तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांनीदेखील दिली होती.