जानेवारी महिन्यात भारतात चार जणांना दक्षिण आफ्रिकेतील नवकरोनाची तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात एका व्यक्तीला ब्राझीलमधील नवकरोनाची लागण झाल्याचे आढळले असल्याची माहिती मंगळवारी केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली.
भारतात अंगोला आणि टान्झानियातून आलेल्या प्रत्येकी एका व्यक्तीला तर दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोन जणांना दक्षिण आफ्रिकेतील नवकरोनाची लागण झाल्याचे जानेवारी महिन्यात आढळून आले, असे आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले.
हे सर्व प्रवासी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी करण्यात आली असून त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ब्राझीलमधून आलेल्या एका व्यक्तीला तेथील नवकरोनाची लागण झाल्याचे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात आढळले. हा प्रवासी आणि त्याच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी करण्यात आली असून त्याचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांच्यावर लशीचा काय परिणाम होतो याची तपासणी सुरू आहे, असे भार्गव म्हणाले.
दरम्यान, ब्रिटनमधील नवकरोनाची देशातील १८७ जणांना लागण झाली आहे, मात्र त्यामुळे अद्याप कोणाचाही मृत्यू झालेला नाही, लशीच्या परिणामकारकतेची चाचणी केली जात आहे. या नवकरोनावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. देशात मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत ८७ लाख ४० हजार ५९५ जणांना लशीची मात्रा टोचण्यात आली. त्यामध्ये ६२ लाख ८२ हजार ६४६ जण आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आहेत, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.
देशात २४ तासांत ९,१२१ रुग्ण, ८१ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : देशात या महिन्यात चौथ्यांदा १० हजारांहून कमी जणांना करोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या एक कोटी, नऊ लाख, २५ हजार, ७१० वर पोहोचली आहे. तर या महिन्यात करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दहाव्यांदा १०० हून कमी झाली आहे, असे मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. देशात गेल्या एक दिवसात एकूण नऊ हजार, १२१ जणांना करोनाची लागण झाली तर ८१ जणांचा मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या एक लाख, ५५ हजार, ८१३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत एक कोटी, सहा लाख, ३३ हजार, २५ जण बरे झाले आहेत, हे प्रमाण ९७.३२ टक्क्य़ांवर पोहोचले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 12:14 am