विश्वचषक २०१९ च्या उपांत्य फेरीमध्ये भारताचा अवघ्या १८ धावांनी पराभव झाल्याने भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा महेंद्रसिंह धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या अफवांनी जोर धरला. मात्र धोनीने अद्याप याबद्दल कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मात्र क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर धोनी राजकारणात उतरुन भाजापासाठी राजकीय मैदानावर फटकेबाजी करणार असल्याचे संकेत बिहारमधील भाजपाच्या एका बड्या नेत्याने दिले आहे. बिहार विधानपरिषदेचे सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी धोनीने भाजपाचे सदस्य व्हावे यासाठी त्याच्याशी अनेकदा बोलणे झाल्याचे स्पष्ट केले आहे. असं झाल्यास, पक्षाला मोठा फायदा होईल असे मत पासवान यांनी व्यक्त केले आहे.

काही महिन्यांपूर्वी भाजपाने हाती घेतलेल्या जनसंपर्क अभियानाअंतर्गत पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासहीत पक्षाच्या इतर बड्या नेत्यांनी धोनीची भेट घेतली होती. ‘क्रीडा, सिनेमा, शिक्षण, सांस्कृतिक कार्य अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना सोबत घेऊन काम करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. प्रत्येक क्षेत्रामधील तज्ज्ञांना सोबत घेण्याचा आमचा विचार आहे,’ असं पासवान यांनी सांगिले. धोनीबद्दल बोलताना पासवान यांनी, ‘धोनी भाजपामध्ये आला तर ते आमच्यासाठी खूपच चांगले होईल. कोणत्याही नेत्यापेक्षा तो जनतेला अधिक प्रभावित करु शकतो’ असं मत व्यक्त केलं.

धोनीने भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतेवर काँग्रेसनेही आपले मत व्यक्त केले आहे. धोनीला राजकारणात यायचे असेल तर कोणत्या पक्षात जायचे हा निर्णय तो स्वत: घेईल असं मत नोंदवले आहे. ‘देशातील लोकप्रिय व्यक्तींना पक्षाचे सदस्य करुन घेण्याचे लक्ष्य भाजपा नेत्यांना देण्यात आले आहे. धोनी भाजपामध्ये जाणार अशी चर्चा तर अमित शाहांनी त्याची भेट घेतली होती तेव्हाही झाली होती,’ असं मत काँग्रेसचे नेते प्रेमचंद मिश्रा यांनी व्यक्त केले आहे.

मागील वर्षी भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी देशातील अनेक बड्या व्यक्तींची भेट घेऊन त्यांना भाजपाच्या कार्यकाळात झालेल्या कामांची माहिती दिली होती. या उपक्रमाला भाजपाने ‘संपर्क से समर्थन’ असे नाव दिले होते.