भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथील सभेच्या वेळी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाबाबत आपण अगोदरच दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिला होता, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
त्यांनी येथे वार्ताहरांना सांगितले, की आमच्याकडे पाटणा येथील सभेच्या वेळी दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेची विशिष्ट किंवा सर्वसाधारण माहिती होती हा भाग वेगळा, पण जेव्हा एखाद्या ठिकाणी सभा असते तेव्हा तुमच्या राज्याला त्या वेळी असलेल्या धोक्याचे इशारे नियमितपणे दिले जातात. तुमच्या राज्यात सभा आहे, त्यामुळे हल्ल्याची शक्यता आहे अशी सूचना देण्यात आली होती.
पाटणा येथे रविवारी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या हुंकार रॅलीच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा ठार व ८० जण जखमी झाले होते.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ७४व्या स्थापनादिनानिमित्त येथे आले असताना त्यांनी सांगितले, की आम्ही दोन-तीन दिवस अगोदर हल्ल्याची सूचना देतो किंवा अमुक दिवशी होईल असे सांगतो. आम्ही तशा सूचना वेळोवेळी देतो. काही वेळा विशिष्ट माहिती असेल तरी ती संबंधित राज्यांना दिली जाते.  

गांधी मैदानाच्या पदपथावर दोन जिवंत बॉम्ब सापडले
पाटणा:भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची ‘हुंकार रॅली’ ज्या गांधी मैदानावर झाली होती तेथे आज दोन जिवंत बाँम्ब सापडले असून एनएसजी व बॉम्बशोधक पथकांनी ते निकामी केले. इंडियन मुजाहिदीनचा प्रमुख यासीन भटकल याच्या पाच साथीदारांनी हे बॉम्बस्फोट घडवले असण्याची शक्यता असून दोनच्या गटाने त्यांनी बॉम्ब ठेवण्याचे काम केले. तहसीन हा प्रमुख संशयित असून हैदर, तौफिक व निमन हे त्याचे इतर साथीदार असून ते इंडियन मुजाहिद्दीनच्या रांची मोडय़ुलचे सदस्य आहेत, असे पाटण्याचे पोलिस अधीक्षक मनू महाराज यांनी सांगितले. तहसीन उर्फ मोनू वगळता सर्व जण २७ ऑक्टोबरला सकाळी बसने पाटण्यात आले होते असे सांगण्यात येते. रेल्वे स्थानकाजवळ पकडलेल्या इम्तियाज याच्याजवळ एक चिठ्ठी होती, त्यात सात मोबाईल नंबर सापडले आहेत. इम्तियाझ-तारीक, तौफिक व निमन, तहसीन व हैदर अशा सहा जणांनी हे बॉम्ब जोडय़ांनी जाऊन ठेवले. इम्तियाज याने पोलिसांना बरेच धागेदोरे दिले असून त्याला उपचारासाठी दिल्लीला नेले जाणार आहे.

काँग्रेसकडून गृहमंत्र्यांची पाठराखण
प्नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी बॉम्बस्फोट झाल्यानंतरही एका चित्रपटाच्या संगीत प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणारे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची पाठराखण करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. ‘गृहमंत्री शिंदे यांना पाटणा बॉम्बस्फोटापलीकडेही आयुष्य आहे,’ असे वादग्रस्त विधान करून काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांनी शिंदे यांना पाठीशी घातले. ‘‘शिंदे यांनी चित्रपटासंबधी कार्यक्रमाला हजेरी लावली असेल तर ती महाभयंकर घटना घडलेली नाही. स्फोटांनंतर मोदींची सभा का रद्द करण्यात आली नाही? मात्र मोदींनी आपल्या भाषणात याबाबत एक शब्दही उच्चारला नाही. कारण भाषणाच्या लिखित प्रतीमध्ये याबाबत काहीही लिहिले नव्हते, त्यामुळे मोदी स्फोटांबाबत काही बोलू शकले नाही का? किंवा भाषणाच्या प्रतीमध्ये होते, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले का? ,’’ असा सवाल विचारून खुर्शिद यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. मोदी यांनी सभेत सहभागी होण्यापेक्षा स्फोटांत जखमी झालेल्यांना मदत करणे गरजेचे होते, असे खुर्शिद म्हणाले.