News Flash

लाच म्हणून एक किलो पेढे मागणारा पोलीस अधिकारी निलंबित

या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर करण्यात आली कारवाई

प्रातिनिधिक फोटो

बिहारमध्ये लाच मागणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आलं आहे. राज्याची राजधानी असणाऱ्या पाटण्यामध्ये ही घटना घडली आहे. एका सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाने लाच म्हणून चक्क एक किलो पेढ्यांची मागणी केली. याच प्रकरणात दोषी आढळल्यामुळे पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. वाहन तपासणीसंदर्भातील या प्रकरणामध्ये एएसआय असणारे भोला राय हे दोषी आढळून आले आहेत. वाहन तपासणीदरम्यान प्रदुषणासंदर्भातील कागदपत्र नसल्याने भोला यांनी भारतीय हवाई दलातील माजी कर्मचाऱ्याकडे लाच मागितली. मात्र पैशांऐवजी एक किलो पेढे देण्याची मागणी भोला यांनी केली. या प्रकरणाचा व्हिडीओ वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचला तेव्हा भोला यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरातील पुनाईचक येथे हा सर्व लाच मागण्याचा प्रकार घडला. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाल्याने पोलीस अधिकाऱ्याचा भांडाफोड झाला आणि त्याला नोकरी गमावावी लागली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. दोन दिवसांपासून शहरामध्ये सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ व्हायरल होत होता. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पुनाईचक चौकामधून जाणाऱ्या हवाई दलातील माजी कर्मचाऱ्याला भोला आणि त्यांच्या सोबतच्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनी तपासणीसाठी थांबवले. त्यानंतर या व्यक्तीकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली. बाईकच्या पीयूसीचे आणि प्रदुषण सर्टीफिकेटचे कागद उपलब्ध नसल्याने येथे उपस्थित असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने या व्यक्तीला भोला यांच्याकडे जाण्यास सांगितलं.

भोला यांनी या गुन्ह्यासाठी १० हजार दंड असून तू हजार रुपये दे अशी मागणी या व्यक्तीकडे केली. अखेर ५०० रुपये देऊन या व्यक्तीला सोडून देण्यासंदर्भात भोला यांनी होकार दिला. मात्र ५०० रुपयामध्ये मी होकार दिल्याबद्दल किमान तोंड तरी गोड कर असं म्हणत भोला यांनी या व्यक्तीकडे एक किलो पेढ्यांची मागणी केली. भोला यांनी या व्यक्तीला एक किलो पेढे घेऊन ये असं सांगितलं. पोलीस लाच म्हणून एक किलो पेढे मागत असल्याचा हा व्हिडीओ या व्यक्तीने लपून शूट केला आणि तो व्हायरल केला. त्यानंतर या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यामध्ये भोला हे दोषी आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 12:29 pm

Web Title: patna police asi bhola rai suspended after demanding peda as bribe scsg 91
Next Stories
1 केजरीवाल सरकारची मोठी घोषणा, आंदोलक शेतकऱ्यांना देणार फ्री Wi-Fi सुविधा
2 नव्या करोनानेही देशात पसरले हातपाय; रुग्णांची संख्या पोहोचली २० वर
3 नव्या करोनामुळे केंद्राचं महत्त्वाचं पाऊल, ब्रिटन-भारत विमानसेवा बंदी वाढवली
Just Now!
X